 
                                                                 मुलगा आणि सुनेच्या वाईट वागणुकीमुळे संतापलेल्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फर नगर जिल्ह्यातील एका वृद्धाने आपली जवळजवळ दीड कोटी रुपयांची संपत्ती उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) राज्यपालांना दान केली आहे. खतौली शहरातील वृद्धाश्रमात राहणारे 85 वर्षीय नाथू सिंह यांनी बुढाणा तहसीलच्या सब-रजिस्ट्रारच्या कार्यालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली जमीन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना म्हणजेच उत्तर प्रदेश सरकारला देण्यात यावी, असे म्हटले आहे.
आपल्या मृत्यूनंतर या जमिनीवर शाळा किंवा रुग्णालय बांधण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. नाथू सिंह यांनी दान केलेल्या जमिनीची किंमत सुमारे दीड कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
उपनिबंधक पंकज जैन यांनी सोमवारी सांगितले की नाथू सिंह यांनी 4 मार्च रोजी त्यांचे मृत्युपत्र तयार केले होते, ज्यामध्ये त्यांचे घर आणि जमीन त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला दान केले आहे. सिंह यांचा आरोप आहे की, त्यांचा मुलगा आणि सुन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. त्यांना ठीक सांभाळत नाहीत. मुलगा व सुनेकडून त्यांना अनेकदा अपमानस्पद वागणूक मिळाली आहे. याच कारणामुळे नाथू यांना वृद्धाश्रमात राहावे लागत आहे.
वृद्धाश्रमाच्या प्रभारी रेखा सिंह यांनी सांगितले की, नाथू सिंह गेल्या पाच महिन्यांपासून त्यांच्या वृद्धाश्रमात राहत आहेत. मुझफ्फरनगरच्या बिरल गावात राहणाऱ्या नाथू सिंह यांना एका मुलाशिवाय तीन मुलीही आहेत. परंतु त्यांचे एकही अपत्य त्यांची काळजी घ्यायला तयार नाही. म्हणूनच आपल्या कोणत्याही अपत्याला आपली मालमत्ता मिल नये अशी नाथू सिंह यांची इच्छा आहे. (हेही वाचा: UP Shocker: कलयुगी आईने सॅनिटायझर टाकून पोटच्या मुलीला जिवंत जाळले; जाणून घ्या काय होता चिमुरडीचा गुन्हा)
नाथू सिंह यांनी सांगितले की, त्यांनी शनिवारी यूपीच्या राज्यपालांना संपत्ती सुपूर्द करण्यासाठी शपथपत्र दाखल केले. नाथू सिंह यांच्या निधनानंतर ही संपत्ती उत्तर प्रदेश सरकारला मिळेल. आपल्या मुलांनी आपल्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू नये, असे सिंह यांना वाटते.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
