उन्नाव सामूहिक बलात्कार (Unnao Gangrape) प्रकरणातील पीडित तरुणीची मृत्युसोबत सुरु असणारी झुंज अखेरीस संपली आणि हृदयविकाराच्या झटक्याने या तरुणीने आपला जीव गमावला. या घटनेननंतर सोशल मीडियापासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्व माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे. या पीडितेच्या कुटुंबीयांना आधार म्ह्णून आता उत्तर प्रदेश सरकारने एक घोषणा करत एक घर आणि 25 लाखांची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान आवास (PM Aavas Yojna) योजनेतून सदर तरुणीच्या कुटुंबाला घर देण्यात येणार असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिली आहे. काहीच दिवसात उन्नावचे जिल्हाधिकारी पीडित महिलेच्या कुटुंबीयांना भेटून आर्थिक मदतीचा धनादेश देणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, पीडितेच्या मृत्यूनंतर लोकांचा उद्रेक वाढला असून हैदराबाद प्रमाणेच तातडीने आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी तरुणीच्या कुटुंबांनी केली होती. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता उन्नाव बलात्कार प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उन्नाव बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले होते. त्यावर उत्तर प्रदेश सरकारने सदर तरुणीच्या कुटुंबीयांना 25 लाखाची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर आज या मदतीची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, उन्नाव बलात्कार प्रकरण हे 1 वर्ष जुने आहे. पीडित तरुणीचा गेल्या वर्षी 2 तरुणांनी बलात्कार केला होता. यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली होती तर दुसरा आरोपी फरार होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला 10 दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. गुरुवारी पीडित तरुणी बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात जात असताना आरोपींनी तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात पीडित तरुणी 90 टक्के भाजली होती. यांनतर तातडीने स्थानिकांनी पीडिताला जवळील रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, शुक्रवारी रात्री पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.शुक्रवारी रात्री 11 वाजून 40 मिनिटाने तिचा मृत्यू झाला.