Unemployment Rate: कोरोना संकट काळात ग्रामीण बेरोजगारीचा दर 14.34 टक्क्यांवर; लॉकडाऊनमध्ये 75 लाखाहून अधिकांनी गमावल्या नोकऱ्या
Unemployment | Representational Image (Photo Credits: pixabay)

कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या दुसर्‍या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown), पुन्हा एकदा रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग बंद पडल्याने देशात बेरोजगारी (Unemployment Rate) पुन्हा एकदा एक वर्षातील उच्चांकावर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम महागाईवर तसेच देशातील बेरोजगारीच्या दरावरही दिसून येत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील बेरोजगारीचा दर वाढत आहे. 16 मे रोजी देशातील बेरोजगारीचा दर 14.5 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या एका वर्षातील ही सर्वोच्च पातळी आहे. या आठवड्यात बेरोजगारीचा दर 49 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी, सीएमआयईने (CMIE) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 16 मे रोजी संपलेल्या आठवड्यात ग्रामीण बेरोजगारीचा दर वाढून 14.34 टक्के झाला आहे. मागील महिन्यात हा दर 7.29 टक्के होता. एप्रिलमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर 75 लाखाहून अधिक लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. अशाप्रकारे शहरी भागात बेरोजगारीचा दर वाढतच आहे, पण आता ग्रामीण भागातही बेरोजगारी वाढली आहे. ग्रामीण भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर 100 टक्क्यांनी वाढून 17.51 ​​टक्के झाला आहे.

सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश व्यास म्हणाले की, आगामी काळात रोजगाराच्या बाबतीत परिस्थिती आव्हानात्मक असेल. मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात आम्ही 75 लाख रोजगार गमावला, यामुळे बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय बेरोजगारीचा दर 7.97 टक्क्यांवर पोहोचला आहे. याआधी शहरी भागात 9.78 टक्के, तर ग्रामीण बेरोजगारीचा दर 7.13 टक्के होता. यापूर्वी मार्च महिन्यात राष्ट्रीय बेरोजगारीचा दर 6.50 टक्के होता आणि ग्रामीण आणि शहरी भागात हा दर तुलनेने कमी होता. (हेही वाचा: कोविड वर मात केल्यानंतर 3 महिन्यांनी मिळणार लस, आता स्तनदा माता देखील घेऊ शकतात लस; केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाची नवी नियमावली)

दरम्यान, कोरोना कालावधीत कोट्यवधी लोकांना त्यांचे घर चालविणे अवघड जात आहे. अशावेळी लोक त्यांचा पीएफचा आधार घेताना दिसून येत आहेत. 1 एप्रिल 2020 पासून साडेतीन कोटी लोकांनी त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढले आहेत. ही संख्या एकूण पीएफ खातेधारकांच्या निम्म्याहून अधिक आहे.