MEA| PC: Twitter

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) मधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. कीव्ह पाठोपाठ युक्रेन मधील खारकीव हे शहर रशियाच्या हल्ल्यात बेचिराख झालं आहे. सध्या युक्रेन मधून भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून तातडीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्येच काही भारतीय विद्यार्थ्यांना ओलिस ठेवण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते पण पराराष्ट्र खात्याने मात्र या वृत्ताचं खंडन करत ही केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले असल्याचा आरोप रशियाने केला होता. युक्रेनमधील खारकीव्ह मध्ये  भारतीय विद्यार्थ्यांना बेलगोरोदला जायचे आहे. मात्र, युक्रेनकडून या विद्यार्थ्यांना रोखण्यात आले असून ओलीस ठेवले आहे. युक्रेनच्या सुरक्षा जवानांकडून या विद्यार्थ्यांचा वापर मानवी ढाल म्हणून केला जात असल्याचा आरोप रशियाने केला आहे. या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत रशियात जाण्यापासून अडवले जात आहे. या प्रकारासाठी युक्रेनचे अधिकारी जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

अधिकृत ट्वीटर अकाऊंट वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 'युक्रेनमधील भारतीय दूतावास येथे भारतीय नागरिकांच्या सातत्याने संपर्कात आहे. युक्रेन प्रशासनाच्या सहकार्याने अनेक जणांनी खारकीव्ह शहर सोडलं आहे. आम्हाला विद्यार्थ्यांना ओलिस ठेवल्याविषयीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या भारतीयांची सुरक्षित घरवापसी सातत्याने सुरू आहे.' त्यामुळे विद्यार्थ्यांना ओलिस ठेवण्यात आल्याच्या वृत्तावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा, Russia-Ukraine War: तिसरे महायुद्ध झाल्यास अन्वस्त्रांचा वापर होऊ शकतो, युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियाचा इशारा, जग चिंतेत).

युक्रेन नजिक असलेल्या इतर देशांमधून भारतीयांना मायदेशी परत पाठवले जात आहे. त्यासाठी लोकांना भारतातून नजिकच्या देशात अर्थात हंगेरी, रोमानिया मध्ये सुरक्षित आणण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी देखील दुतावास युक्रेन सोबत संपर्कात आहे. केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा असं त्याला नाव देण्यात आले असून मोदी सरकारमधील 4 मंत्री जातीने यामध्ये लक्ष घालून काम करत आहेत. दुर्देवाने 2 भारतीय विद्यार्थ्यांचा यामध्ये मृत्यू देखील झाला आहे. एकाचा गोळीबारामध्ये तर एकाचा आजारपणाने मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

हजारो भारतीयांना युक्रेन मधून भारतात परत पाठवण्यासाठी वायुसेनेसह इतर विमान कंपन्यांची विमानं तैनात करण्यात आली आहेत.