Tripura Assembly Election 2023: त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरु; राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर राज्याकडे देशाचे लक्ष्य
Election | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यांत्रेनंतर पहिल्यांदाच पार पडत असलेल्या त्रिपुरा विधानसभा (Tripura Assembly Elections 2023) निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. आज (16 फेब्रुवारी) सकाळी सात वाजलेपासू मतदानास सुरुवात झाली. सकाळी सात ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार आहे. विधानसभेच्या 60 जागांवर आज 259 उमेदवारांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या वेळी सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना असला तरी, इतरही पक्षांनी दमदार दावेदारी केल्याने सामना तिरंगी आणि बहुरंगीही ठरला आहे. त्यामुळे मतदार राजाच्यामनात काय आहे हे प्रत्यक्ष निकालादिवशीच कळणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, त्रिपूरा राज्यातील एकूण 28.14 लाख मतदारांपैकी 14,15,233 पुरुष मतदार, 13,99,289 महिला मतदार आणि 62 तृतीय लिंगाचे मतदार मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत. यात 18-19 वयोगटातील 94,815 आणि 22-29 वयोगटातील 6,21,505 मतदार आहेत. सर्वाधिक 40-59 वयोगटातील मतदारांची संख्या 9,81,089 आहे. पात्र असलेल्या या सर्व मतदारांसाठी 3 हजार 337 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. दरम्यान, मतदान सुरळीत पार पडावे यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. राज्यात 97 सर्व महिला-व्यवस्थापित पोलिस ठाणी आहेत. (हेही वाचा, Assembly Elections 2023: नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा विधानसभा निवडणूक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम)

वर्षानुवर्षे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस आणि सीपीआयएमने सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी निवडणूकपूर्व युती केल्याने तिरंगी लढत होणार आहे. आपली सत्ता कायम ठेवू पाहणारा भाजप स्वदेशी पीपल्स फ्रंट ऑफ इंडियाशी आघाडी करून निवडणूक लढवत आहे. त्रिपुरा (IPFT) आणि त्रिपुरा मोथा यांना त्रिशंकू विधानसभेच्या परिस्थितीत किंगमेकर म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, 2021 मध्ये शाही वंशज प्रद्योत किशोर देबबर्मा यांनी स्थापन केलेला एक प्रभावशाली प्रादेशिक पक्ष म्हणून उदयास आला. दरम्यान, तृणमूल काँग्रेसनेही उमेदवार उभे केले आहेत.