लहान मुलांवर Covaxin च्या ट्रायल्स जून 2021 पासून सुरू होण्याची शक्यता; Bharat Biotech ची माहिती
Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

भारत बायोटेक (Bharat Biotech) कडून कोवॅक्सिन (Covaxin) ची लहान मुलांवरील ट्रायल्स आता जून महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. असे भारत बायोटेक कडून सांगण्यात आले आहे. सध्या या ट्रायल्ससाठी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे परवानगी मागितली आहे. भारत बायोटेकच्या Raches Ella यांनी काल (23 मे) FICCI Ladies Organisation (FLO) Hyderabad च्या सदस्यांसोबत व्हर्च्युअल मिटिंग दरम्यान बोलताना ही माहिती दिली आहे. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे या वर्षाच्या तिसर्‍या तिमाही मध्ये त्यांना लायसन्स मिळू शकतं.

दरम्यान या संवादा दरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकने लसींचे डोस बनवण्याचे काम वेगाने सुरू ठेवले आहे. आता वर्षाअखेरीस 700 मिलियन डोस तयार केले जातील. 'सध्या देशात कोवॅक्सिन चे दिलेले डोस सकारात्मक परिणाम दाखवत आहे हे पाहून कष्टाचं चीज झाल्याची भावना दररोज दिवसाच्या शेवटी मिळत आहे आणि ते दिलासादायक आहे.

सरकारच्या आयसीएमआर सोबत आता भारत बायोटेकने लस बनवली आहे. या लसीकरण कार्यक्रमामध्ये केंद्र सरकार कडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याची भावना Ella यांनी व्यक्त केली. सध्या केंद्राकडून भारत बायोटेक कडे 1500 करोड लसींची आगाऊ मागणी आहे. सध्या बेंगलोर आणि गुजरात मध्येही कॉवॅक्सिनचे डोस बनवण्याचं काम सुरू आहे. (नक्की वाचा: Covaxin घेतलेल्या नागरिकांवर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी निर्बंध? जाणून घ्या कारण ).

भारतामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठं नुकसान झालं आहे. चार लाखांच्या पार दिवसागणिक गेलेली रूग्णसंख्या आणि मृत्यूची रेकॉर्डब्रेक संख्या निराशाजनक होती. या पार्श्वभूमीवर आता वैज्ञानिक आणि आरोग्य यंत्रणांनी तिसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. आणि त्याला रोखण्यासाठी आता लसीकरण हाच केवळ शस्त्र म्हणून वापर करून त्याचा प्रभाव आटोक्यात ठेवण्यास फायदेशीर ठरू शकतो म्हणून लसीकरण वाढवण्यासाठी आता भारत सरकार, राज्य सरकार प्रयत्न करत आहे.