Heavy rains in Jammu and Kashmir (फोटो सौजन्य - X/@WeatherMonitors)

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला. तर 100 हून अधिक जणांना वाचवण्यात यश आले. शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटी आणि अचानक आलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे रामबन जिल्ह्यातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दोन हॉटेल्स, दुकाने आणि काही घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.

वीज पडून दोघांचा मृत्यू - 

जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी रियासी जिल्ह्यातील अर्नास तहसीलमधील दुग्गाजवळील चांटू गली येथे ढग फुटले आणि यादरम्यान आकाशातून वीजही पडली. या घटनेत 60 वर्षीय अब्दुल रशीद आणि 25 वर्षीय शहनाज बेगम यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही रियासीच्या भोमाग तहसीलमधील लामसोरा गावातील रहिवासी होते. या घटनेत गुलजार बेगम (55) ही आणखी एक महिला जखमी झाली. ती देखील लामसोरा गावची रहिवासी आहे. जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Delhi Building Collapse: पूर्व दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये 6 मजली इमारत कोसळली; मृतांची संख्या 11 वर पोहोचली, बचावकार्य सुरू)

40 मेंढ्या आणि शेळ्याही मृत्युमुखी - 

ढगफुटीनंतर वीज कोसळून 40 शेळ्या आणि मेंढ्यांचाही मृत्यू झाला. ढग फुटल्यानंतर संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. रियासी जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांवर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली.

मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान- 

मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याची पातळी वाढली आणि अचानक पूर आला. चिनाब पुलाच्या धरम कुंडजवळील एका गावात पुराचे पाणी शिरले. ढगफुटीमुळे दहा घरांचे पूर्णपणे नुकसान झाले. 25 ते 30 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. या भागात अडकलेल्या सुमारे 90 ते 100 लोकांना धरमकुंड पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले आहे.

जम्मू-श्रीनगरमधील  रस्ते बंद - 

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. संपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर मुसळधार पाऊस पडत आहे. याशिवाय, एसएसजी रोड/मुघल रोड/सिंथन रोड देखील बंद आहे. हवामान सुधारेपर्यंत आणि रस्ते मोकळे होईपर्यंत प्रवाशांना प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.