Vizag Gas Tragedy: विशाखापट्टणम मधील LG Polymers Industry मधून पुन्हा गॅसगळती झाल्याच्या बातम्या निव्वळ अफवा; NDRF कडून स्पष्टीकरण
VIzag Gas Leak (Photo Credits: ANI)

काल (7 मे) आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे LG Polymers Industry मधून विषारी वायू गळती झाल्याची दुर्घटना घडली. यात 11 जणांचा मृत्यू झाला असून 300 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री पुन्हा गॅसगळती झाल्याचे समोर आले होते. मात्र या निव्वळ अफवा असल्याचे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (Director General of National Disaster Response Force) महासंचालक एसएन प्रधान (SN Pradhan) यांनी सांगितले आहे. विशाखापट्टणम येथे पुन्हा एकदा वायूगळती झाल्याची अफवा काही समाजमाध्यमांमध्ये पसरली होती. मात्र अशा दुसऱ्यांदा कोणत्याही प्रकारची गॅसगळती न झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Vizag Gas Tragedy: LG Polymers Industry मधून पुन्हा एकदा गॅस गळती, जवळपासची गावं रिकामी करण्याचे आदेश)

NDRF चे महासंचालक एसएन प्रधान म्हणाले की, "पुन्हा एकदा गॅसगळती झाल्याच्या बातम्या काही समाजमाध्यमातून चालवल्या जात आहेत. मात्र दुसऱ्यांना गॅस गळती न झाल्याचे सर्वप्रथम मी स्पष्ट करतो. विषारी वायू गळतीमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या प्रक्रीयेत काही गॅस फ्युम्स बाहेर पडतात. पण ते अत्यंत नगण्य असतात. त्यापुढेही असे काही गॅस फ्युम्स बाहेर पडतील. मात्र त्या आधारावर चुकीच्या बातम्या देणे गैर आहे." त्याचबरोबर तथ्य तपासून बातम्या देण्याचे त्यांनी यावेळेस मीडियाला आवाहन केले. समाजात विनाकारण काळजी, भीती पसरेल, अशा बातम्या देऊ नका, असेही ते म्हणाले.

ANI Tweet:

या गॅसगळती दुर्घटनेत 2 लहान मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या विषारी गॅसने 1000 हून अधिक लोकांचा जीव धोक्यात घातला आहे. विशेष म्हणजे हा प्लांट कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे गेल्या 40 दिवसांपासून बंद आहे. दरम्यान या दुर्घटनेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात आली असून त्यांनी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना दिले आहे. तर यात मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.