Representative Image (Photo Credits: PxHere)

लग्नात मेकअपचे (Makeup) किती व काय महत्व आहे हे एक नवरीच सांगू शकेल. आजकाल सोशल मिडियामुळे वधूच्या मेकअपचा ट्रेंड इतका वाढला आहे की, प्रत्येक वधूला आपल्या लग्नात उत्तम वेषभूषा करून एखाद्या अभिनेत्रीसारखे दिसावे असे वाटते. मुलीही लग्नातील मेकअपसाठी हजारो रुपये खर्च करत असतात. परंतु लग्नातील हा इतका महत्वाचा मेकअप बिघडला तर? वधूला नक्कीच वाईट वाटेल. परंतु मध्य प्रदेशच्या जबलपूर (Jabalpur) येथील एका मुलीला आपला मेकअप बिघडल्याचा इतका राग आला की ती चक्क पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली.

जबलपूरची वधू, राधिका सेन लग्नापूर्वी मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये आली होती, मात्र ब्युटीशियनने तिचा मेकअप खराब केला. यामुळे नाराज झालेली राधिका इतकी संतप्त झाली की ब्युटीशियनची तक्रार करण्यासाठी ती आपल्या नातेवाईकांसह जबलपूरमधील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. वधूच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ब्युटी पार्लरच्या संचालकाने आधी वधूचा मेकअप खराब केला आणि तक्रार केल्यानंतर फोनवर धमकी दिली.

कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अनिल गुप्ता यांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे सांगितले. ब्युटीशियन मोनिका पाठक हिची या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. प्रकरण 3 डिसेंबरचे आहे. त्या दिवशी वधू राधिका सेनच्या लग्नाची वरात येणार होती. ब्युटी पार्लर ऑपरेटर मोनिका पाठक हिच्याकडून 3500 रुपयांमध्ये राधिकाचा मेकअप करून घेण्याचे कुटुंबीयांनी आधीच ठरवले होते.

लग्नाच्या वरातीपूर्वी मेकअप करण्यासाठी वधूच्या नातेवाईकांनी मोनिका पाठकशी फोनवर संपर्क साधला. मोनिका पाठकने सांगितले की, ती काही कामानिमित्त बाहेर जात आहे त्यामुळे राधिका तिच्या पार्लरमध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांकडून तिचा मेकअप करून घेऊ शकते. ब्युटी पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी राधिकाचा मेकअप खराब केल्याचा आरोप आहे. कुटुंबियांचे त्यांचे म्हणणे आहे की, मोनिका पाठकच्या ब्युटी पार्लरमध्ये तैनात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी असा घाणेरडा मेक-अप केला की कोणालाच तो आवडला नाही. (हेही वाचा: तीन मुलांच्या आईने 19 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडशी पोलीस स्टेशनमध्ये केले लग्न, जाणून घ्या सविस्तर)

राधिकाच्या कुटुंबीयांनी मोनिका पाठककडे तिच्या कर्मचाऱ्याची तक्रार केली असता, तिने आपली चूक मान्य करण्याऐवजी राधिकाच्या कुटुंबीयांना धमक्या देण्यास सुरुवात केली. ब्युटी पार्लर संचालक मोनिका पाठकने वधू राधिका सेन आणि तिच्या कुटुंबियांसोबत असभ्य वर्तन आणि जातीय शेरेबाजी केली. त्यानंतर सेन समाजाच्या सदस्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.