महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने पत्नीला अगदी क्षुल्लक कारणावरून ट्रिपल तलाक (Ttriple Talaq) दिला आहे. ही महिला एकटी फिरायला गेली होती म्हणून तिला घटस्फोट देण्यात आला आहे. महिला एकटी फिरायला गेल्याने पतीला राग आला होता. माहितीनुसार, ठाणे पोलिसांनी पत्नीला ‘ट्रिपल तलाक’ दिल्याप्रकरणी या 31 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी या घटनेची माहिती दिली.
मुंब्रा भागातील रहिवासी असलेल्या आरोपीने मंगळवारी आपल्या 25 वर्षीय पत्नीच्या वडिलांना फोन केला आणि सांगितले की तो 'तिहेरी तलाक'द्वारे त्यांचे लग्न रद्द करत आहे, कारण त्याची पत्नी एकटी फिरायला जात होती. पत्नीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी बुधवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(4) अंतर्गत गुन्हेगारी धमकी आणि मुस्लिम महिला (विवाह अधिकारांचे संरक्षण) कायद्यानुसार एफआयआर नोंदवला. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. ही घटना अशा वेळी घडली जेव्हा भारतात कायद्यानुसार तिहेरी तलाकवर बंदी आहे आणि तो गुन्हा मानला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने 22 ऑगस्ट 2017 रोजी दिलेल्या निकालात तिहेरी तलाक असंवैधानिक घोषित केला होता. (हेही वाचा: युपी: मुलगी जन्माला आली म्हणून नवऱ्याने बायकोला तिहेरी तलाक देत रस्त्यावर सोडून काढला पळ)
सर्वोच्च न्यायालयाने 1400 वर्ष जुनी प्रथा असंवैधानिक घोषित केली होती आणि सरकारला कायदा करण्यास सांगितले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कायदा करताना तीनदा तलाक लिहून किंवा बोलून लग्न मोडणे गुन्ह्याच्या श्रेणीत समाविष्ट केले. या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कारावासाचीही तरतूद आहे.