Arrested | (File Image)

ATM Robbery Gang Nab:  केरळ राज्यातील त्रिशूर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे तीन एटीएम (Kerala SBI ATM Robbery) लुटून 60 लाख रुपयांहून अधिकची रोकड घेऊन पलायन केलेल्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. एटीएम लुटणारी टोळी (ATM Robbery Gang) तामिळनाडू पोलिसांनी (Tamil Nadu Police) सिनेस्टाईल पाटलाग करुन जेरबंद केली आहे. प्राथमिक चौकशीत, सदर टोळीचा केरळ राज्यातील एटीएम दरोडा (ATM Robbery) मालिकेत सहभाग आढळून आला आहे. सात सदस्यांची ही टोळी, शुक्रवारी (27 सप्टेंबर) एका ट्रकमधून प्रवास करत होती. संशय आल्याने पोलिसांनी हा ट्रक आडवला असता त्यातील एकाने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात टोळीतील एकाचा मृत्यू झाला आहे तर आणखी एक जण जखमी झाला आहे. धक्कादायक म्हणजे ट्रकमध्ये लाखोरुपयांचीच रोख रक्कम, नंबरप्लेट नसलेली एक कार आणि काही शस्त्रेही आढळून आली आहेत.

सीनेस्टाईल थरार, दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांनी या टोळीचा सिनेस्टाईल पाटलाग केला आणि गुन्हेगाऱ्यांच्या मुसक्या नाट्यमयरित्या आवळल्या. प्राप्त माहितीनुसाह हा थरार शुक्रवारी (27 सप्टेंबर) रात्री घडला. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार तामिळनाडू पोलीस गस्त घालत असता, त्यांनी नमक्कल महामार्गावर एक कंटेनर (ट्रक) थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने थांबविले नाही उलट ते पुढेच दामटवले. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी या वाहनाचा पाटलाग केला. पोलिसांकडून या संशयित वाहनाचा 12 किलोमीटर पाठलाग झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक अडवल्यानंतर आणि मागील दरवाजा उघडल्यानंतर संशयितांनी पोलिसांवर हल्ला केला. यामुळे अधिकाऱ्यांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला, त्यात एक संशयित जखमी झाला आणि दुसऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसानी सर्व संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता हे सातही जण एक टोळी चालवत होते. जी एटीएमवर दरोडा टाकत असे. धक्कादायक म्हणजे या टोळीने केरळमधील त्रिशूर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे तीन एटीएम लुटून 60 लाखांहून अधिक रोकड घेऊन पलायन केले होते, असे चौकशीदरम्यान पुढे आले. (हेही वाचा, ATM Robbery Video: चोरट्यांनी लढवली शक्कल,कार वापरून महाराष्ट्र बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न; चोरांना पकडण्याचा बीड पोलिसांचा प्रयत्न फसला)

हल्ल्यात दोन पोलीस जखमी

दरम्यान, दरोडेखोर टोळीसोबत झालेल्या चकमकीत एका निरीक्षकासह दोन पोलीस अधिकारी जखमी झाले. वेस्टर्न रेंजचे पोलिस महानिरीक्षक टी सेंथिल कुमार यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, ''हल्ल्यामध्ये आमचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. सहा संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले, ते सर्व हरियाणाचे आहेत''. (हेही वाचा, Navi Mumbai: बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना FIU कडून अटक, नवी मुंबईतील लॉजवरून घेतले ताब्यात)

एटीएम फोडून 60 लाखांवर डल्ला

या टोळीने शुक्रवारी पहाटे थ्रिसूरमधील तीन एटीएमला लक्ष्य करून 60 लाखांची रक्कम लुटली. ताज्या अपडेट्सनुसार, पोलिस अजूनही टोळीच्या कंटेनर ट्रकमधून जप्त केलेल्या रकमेची अचूक मोजणी करत आहेत. अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले की, ''आम्ही रोख मोजत आहोत. आम्हाला जप्तीचा तपशील लवकरच कळेल आणि त्यानंतर आम्ही एक निवेदन जारी करू.''

ट्रकमध्ये नंबरप्लेट नसलेली कार आणि शस्त्रास्त्रे

अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ट्रकच्या आत, पोलिसांना एक नंबर प्लेट नसलेली एक कार सापडली. जी लपवली होती आणि जिचा एटीएम फोडण्यापूर्वी टोळीने टोळीने वापर केल्याचा संशय आहे. आरोपींनी कार सीसीटीव्हीच्या कक्षेत येऊ नये यासाठी ते कारमध्ये ठवले होते, असे प्राथमिक चौकशीत सांगितले. कार व्यतिरिक्त, पोलिसांनी एटीएम फोडण्यासाठी वापरलेली बंदुक आणि गॅस कटरसह अनेक शस्त्रे जप्त केली. तामिळनाडूचे पोलीस महासंचालक शंकर जिवल यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीच्या मोडस ऑपरेंडीमध्ये कारचा वापर करून त्यांचे लक्ष्य शोधून काढणे, ते पाळत ठेवण्याच्या यंत्रणेला बायपास करू शकतील याची खात्री करणे अशा प्रकारांचा समावेश होता.

टोळीतील सर्वजण हरियाणा राज्यातील

पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरु असून तपासही सुरु आहे. हे सर्वजण हरियाणा राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. विविध प्रदेशात अनेक एटीएम लुटण्यात त्यांचा सहभाग होता. ते इतरही काही गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी आहेत का? याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.