Edappadi K. Palaniswami | (Photo Credit- Twitter)

Lok Sabha Elections 2019: तमिळनाडू ((TamilNadu) राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी ( Chief Minister Edappadi K. Palaniswami) यांच्यावर चप्पल फेकण्यात आल्याचे समजते. पलानीस्वामी हे लोकसभा निवडणूक प्रचार करण्यासाठी तंजावूर (Thanjavur) येथे पोहोचले असताना सोमवारी (1 एप्रिल) ही घटना घडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यावर चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.

मिरर नाऊने दिलेल्या वृत्तात दाखवलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये पलानीस्वामी यांच्यावर चप्पल पडताना स्पष्ट दिसते. दरम्यान, 18 एप्रिल रोजी तामिळनाडू राज्यातील 39 लोकसभा जागांसाठी मतदान केले जाणार आहे. या मतदानाची मतमोजणी ही 23 मे रोजी करण्यात येणार आहे. मिरर नाऊने आपल्या ट्विटर हँडलवर या वृत्ताबाबत व्हिडिओ शेअर केला आहे.

मुख्यमंत्र्यांवर चप्पल फेकण्याची ही पहिलीच घटना नाही, यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांच्यावरही अशाच प्रकारे चप्पल फेकण्यात आली होती. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहाण यांच्यावरही अशीच चप्पल फेकण्यात आली होती. आता पलानीस्वामी यांच्यावर चप्पल फेकल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, पलानीस्वामी यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच पलानीस्वामी यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब सापडल्याचे वृत्त आले होते. मात्र, सखोल चौकशीनंतर या वृत्तत तथ्य नसल्याचे पुढे आले. बॉम्ब ठेवल्याची ती केवळ अफवा होती असे, तपास यंत्रणांनी स्पष्ट केले होते. प्राप्त माहितीनुसार,ही अफवा पसरवणाऱ्या व्यक्तिला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, तो मनोरुग्ण (मानसिक विकलांग) असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या व्यक्तिने सोमवारी (18 मार्च) सकाळी पोलीसांना फोन करुन माहिती दिली की, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात बॉम्प ठेवण्यात आला आहे.