Sulli Deals 2.0: GitHub वर ‘Bulli Bai' अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना केले टार्गेट; पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रिय व्यक्तींचे फोटो सोशल मिडियावर शेअर

काही दिवसांपूर्वी ‘सुल्ली डील्स’वरून (Sulli Deals) सोशल मीडियावर बराच वाद झाला होता. सुल्ली डील्स अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना टार्गेट करून त्यांच्या आक्षेपार्ह फोटोंच्यासाठी बोली लावली जात होती. सुल्ली डील्स अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिला पत्रकार, कार्यकर्ते, कलाकार आणि संशोधकांना टार्गेट करण्यात आले. त्यांच्या फोटोंचा खुलेआम लिलाव चालू होता. आता ‘सुल्ली डील्स’ वादानंतर 6 महिन्यांनी पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात येत आहे. शनिवारी, 1 जानेवारी रोजी, शेकडो मुस्लिम महिलांची छायाचित्रे अज्ञात गटाने गिटहब (GitHub) चा वापर करून वापरून 'बुल्ली बाई' (Bulli Bai) नावाच्या अॅपवर अपलोड केली.

बुल्ली बाई हॅशटॅग (#Bullibai) च्या माध्यमातून सोशल मीडियावर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात येत आहे. GitHub हे एक एक होस्टिंग प्लॅटफॉर्म आहे जिथे ओपन सोर्स कोडचे भांडार आहे. सुल्ली डील्सप्रमाणेच बुल्ली बाई अॅपदेखील GitHub वर तयार केले आणि वापरले जाते. @bullibai नावाच्या ट्विटर हँडलद्वारे ‘बुल्ली बाई’ची जाहिरात देखील केली जात होती, ज्यावर ‘खलिस्तानी समर्थका’चा फोटो दाखवण्यात आला आहे. महिलांना या अॅपवरून ‘बुक’ केले जाऊ शकते असेही म्हटले होते. हे हँडल खलिस्तानी कंटेंटचा प्रचारही करत होते.

हे अॅप GitHub वरून काढून टाकण्यात आले आहे की नाही याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. प्लॅटफॉर्मने आपल्या बाजूने स्पष्टीकरणदेखील दिले नाही. याबाबत दिल्ली पोलिसांनी शनिवारी ट्विटरवर सांगितले की, त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले आहे. काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी याप्रकरणी कारवाईसाठी केंद्रीय गृहमंत्री आणि मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे. दोषींवर आणि या ‘योजनेमागील’ लोकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दोघांनी केली आहे.

याबाबत प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, ‘मी मुंबई पोलीस आयुक्त आणि डीसीपी क्राईम रश्मी करंदीकर यांच्याशी बोललो आहे. ते या प्रकरणाची चौकशी करतील. मी मध्यस्थीसाठी डीजीपी महाराष्ट्र यांच्याशीही बोलले आहे. आशा आहे की अशा चुकीच्या साइट्समागे असलेल्यांना पकडले जाईल.’ (हेही वाचा: WazirX सह देशातील अनेक क्रिप्टो एक्सचेंजेसवर DGGI चे छापे, कोट्यावधी रुपयांची करचोरी उघड)

मुंबई पोलिसांनी सांगितले की ते या प्रकरणाचा तपास करीत आहेत आणि आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर मतही जाणून घेत आहेत. ‘सुल्ली डील्स’बाबत अज्ञात व्यक्तींविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, मात्र, कोणालाही अद्याप अटक करण्यात आली नाही.