गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या खलबतांना आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील पाच माजी मुख्यमंत्र्यांसह 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्ष वाढीबाबत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिल्यानंतर आज त्यासंदर्भात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. यामुळे या पक्षाबाबत आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान ‘हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं’ अशी मागणी सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत केली आहे. PTI ने याबाबत माहिती दिली आहे.
काँग्रेसमधील पाच माजी मुख्यमंत्र्यांसह 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्ष वाढीबाबत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात ही काहीतरी ठोस पावले उचलण्याच्या उद्देशाच्या काँग्रेस समितीची ही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
Sonia Gandhi asks CWC to relieve her as interim party chief, ex-PM Manmohan Singh urges her to continue:Sources
— Press Trust of India (@PTI_News) August 24, 2020
बैठकीच्या सुरूवातीलाच सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर देणारं पत्र कार्यसमितीकडे दिलं. त्याचबरोबर “आपल्याला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं”, अशी मागणीही त्यांनी बैठकीत केली. मात्र, पक्षाचं नेतृत्व करत राहावं, अशी विनंती डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांना केली.
अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या मागणीबरोबरच सोनिया गांधी यांनी नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी सूचनाही काँग्रेस नेत्यांना केल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.