Ban on Single Use Plastic Items: देशात एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर 1 जुलै 2022 पासून बंदी
Plastic | Representational Image | (Photo Credits: Creative Commons)

एकेरी वापरातील प्लॉस्टिक वस्तूंवर (Single Use Plastic Items) बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण मंत्रालयाने घेतला आहे. 1 जुलै 2022 पासून पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. यानंतर एकेरी वापरातील प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असेल. प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यापूर्वी प्लॉस्टिक बंदीचे निर्णय अनेकवेळा घेण्यात आले. मात्र अद्याप त्याची कठोरपणे अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.

ध्वज, फुगा, आइसक्रिम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारा थर्माकॉल, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, ट्रे, स्वीट बॉक्स, आमंत्रण कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवर प्लास्टिक रॅप यांचा एकेरी वापरातील प्लॉस्टिकच्या वस्तूंमध्ये समावेश होतो.

ANI Tweet:

प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी सरकार विविध पाऊलं उचलत आहे. प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रम सरकारकडून आयोजित केले जात आहेत. तसंच कचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधा तयार करण्यात आली आहे. ('Single Use' प्लास्टिक ला देशभरात बंदीचे आवाहन, तर पुण्यात 100% प्लास्टिक बंदीची घोषणा)

दरम्यान, सध्या देशात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडींच्या प्लॉस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आहे. 30 सप्टेंबर 2021 पासून ही जाडी 75 मायक्रॉन करण्यात येणार आहे. तर 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉन केली जाणार आहे.