Coronavirus cases | (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणू महामारीच्या चौथ्या लाटेच्या बातम्यांदरम्यान एक धक्कादायक खुलासा झाला आहे. लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, महामारीदरम्यान झालेल्या मृत्यूंची संख्या अधिकृतपणे नोंदवलेल्या मृत्यूपेक्षा तिप्पट असू शकते. नोंदीनुसार, 2021 च्या अखेरीस जगात कोरोनामुळे 60 लाख लोकांचा मृत्यू झाला. परंतु अभ्यासात सहभागी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की 2020 च्या सुरुवातीपासून ते 2021 च्या अखेरीस किमान 1 कोटी 82 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे.

द लॅन्सेटच्या दाव्यावर विश्वास ठेवला तर, भारतात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 40 लाखांहून अधिक आहे. लॅन्सेटने आपल्या ताज्या अहवालात दावा केला आहे की, भारतात कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा 8 पट जास्त आहे. भारत सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 4,89,000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र लॅन्सेटचा दावा खरा मानला तर देशात 40 लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लॅन्सेटचा एक नवीन शोधनिबंध असे सूचित करतो की, भारतात कोविड-19 मुळे मृत्यूची नोंद खूप कमी होती. लॅन्सेटच्या मते, 2021 च्या अखेरीस, जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत आणि त्यांची संख्या सुमारे 40.7 लाख होती. लॅन्सेटचा हा शोधनिबंध शुक्रवारी प्रकाशित झाला. (हेही वाचा: Corbevax कोविड 19 लस 5-12 वयोगटातील मुलांना देण्याकरिता आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी Biological E कडून अर्ज; सूत्रांची माहिती)

लॅन्सेटच्या मते, देशपातळीवर कोविड-19 मुळे भारतात 40.7 लाख, अमेरिकेत 11.3 लाख आणि रशियामध्ये 10.7 लाख लोकांचे मृत्यू झाले आहेत. लॅन्सेटच्या अहवालात म्हटले आहे की, भारतात नोंदवलेला कोविड मृत्यू दर प्रति 1,00,000 18.3 आहे. लॅन्सेटचा अंदाज आहे की वास्तविक मृतांची संख्या 40.7 लाख आहे. जे अधिकृत आकडेवारीपेक्षा आठ पट जास्त आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत, जगभरातील कोरोना मृत्यूंपैकी भारताचा वाटा 22.3% आहे. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी 187 देशांमधून 2020 आणि 2021 चे कोरोना मृत्यू अहवाल गोळा केले.