Shocking! मुलाला लागली Free Fire Game ची सवय; अभ्यासात मागे पडल्याने केली आत्महत्या
Garena Free Fire (PC - Tech Takneek @TechTakneek/twitter)

कोचिंग सिटी कोटा (Kota) येथून पुन्हा एकदा आत्महत्येची (Suicide) धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आंध्र प्रदेशमधील एका विद्यार्थ्याने ऑनलाइन गेममुळे मृत्यूला कवटाळले. हा मुलगा ऑनलाइन गेमच्या आहारी गेला होता, त्यामुळे त्याला ऑफलाइन क्लासेसला उपस्थित राहता येत नव्हते. गेममुळे त्याचे अनेक क्लासेस बुडाले असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. यामुळे 17 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षेबाबत टेंशन घेऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या विद्यार्थ्याला त्याच्या पालकांनी वैद्यकीय परीक्षेच्या तयारीसाठी कोटा येथे पाठवले होते.

प्रकरणाचे तपास अधिकारी ओमप्रकाश यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी रात्री कोटा येथील महावीर नगर भागात घडली. येथे आंध्र प्रदेश येथील एक 16 वर्षांचा विद्यार्थी NEET ची तयारी करत होता. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून तो कोटा येथील महावीर नगर परिसरात असलेल्या वसतिगृहात राहत होता. शनिवारी रात्री त्याने आपल्या खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. यापूर्वी त्याने उंदीर मारण्याचे औषध घेतले होते. विद्यार्थी अभ्यासात चांगला होता. मात्र तो मोबाईलवर सतत 'फ्री फायर' गेम (Free Fire Game) खेळायचा.

विद्यार्थ्याचे वडील अंदमान निकोबार पोलीस विभागात कार्यरत आहेत. तीन भावांमध्ये तो मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 5 महिन्यांपासून तो ऑनलाइन गेम खेळत होता. याची त्याला सवय लागली होती. याबाबत त्याला अनेक वेळा समजावूनही सांगण्यात आले होते. मात्र मुलाला आत्मविश्वास होता की, हा खेळ खेळूनही आपण चांगले मार्क्स आणून डॉक्टर होऊ. परंतु या गेममुळे तो अभ्यासापासून दूर जात होता. वसतिगृह चालकानेही मुलाच्या वडिलांना मुलाचे अभ्यासात मन नाही, त्याला इथून घेऊन जा, असे सांगितले होते. (हेही वाचा: 4 वर्षांच्या मुलीने अभ्यासात रस न दाखवल्याने पालकांनी दिली मृत्यूची शिक्षा; मृतदेह झुडपात फेकून दिला)

काही तरुण आपल्या मुलावर फ्री फायर गेम खेळण्यासाठी दबाव आणत असल्याचा संशय विद्यार्थ्याच्या वडिलांना होता. मुलाच्या मोबाईलमधील मेसेजेसधून ही बाब समोर आली. बहुदा याच तणावातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.