झारखंडमधील (Jharkhand) जमशेदपूर (Jamshedpur) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 4 वर्षांच्या निष्पाप मुलीने अभ्यास न केल्याने निर्दयी पालकांनी तिला मृत्यूची शिक्षा दिली आहे. ही मुलगी अभ्यासात रस दाखवत नसल्याने पालकांनी तिचे हात पाय बांधून, तिला बेदम मारहाण केली. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. ही घटना 29 जून रोजी घडली होती.
जमशेदपूरपासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या गालुडीहमध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूला झुडपात मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर मंगळवारी ही घटना उघडकीस आली. मुलीचे वडील उत्तम मैती (27) आणि आई अंजना महतो (26) यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. मुलीचे आई-वडील मजुरीचे काम करतात. त्यांना अजून एक मुलगी आहे जी तिच्या मामाच्या घरी राहते.
याबाबत त्यांनी पोलिसांना सांगितले की, वारंवार समज देऊनही त्यांची लहान मुलगी अभ्यासात रस दाखवत नव्हती. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी तिचे हात-पाय बांधून बेदम मारहाण केली. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली. त्यानंतर मुलीला खासमहाल येथील सदर रुग्णालयात नेले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ते सालगाझुरी स्थानकावरून ट्रेनमध्ये चढले आणि गालुडीह स्थानकावर उतरले. या ठिकाणी त्यांनी मुलीचा मृतदेह रेल्वे रुळाजवळील झुडपात फेकून दिला आणि नंतर दोघे पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे गेले. मुलीचे मामा झारग्राम येथे राहतो.
आठवडाभरानंतर मंगळवारी ते बारीगोडा येथे परतले असता शेजाऱ्यांनी त्यांना त्यांच्या मुलीबाबत विचारपूस केली मात्र त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. काहीतरी गडबड झाल्याचा संशय आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली, त्यावेळी आरोपींनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. (हेही वाचा: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, बलात्कारादरम्यान व्हिडीओ काढून केलं सहा महिने शोषण)
शेजाऱ्यांनी सांगितले की, मुलीचे आई-वडील सुमारे तीन महिन्यांपासून बारीगोडा येथे भाड्याच्या घरात राहत होते. आई-वडील मुलीला अनेकदा मारहाण करायचे. यामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा संशय शेजाऱ्यांना आला.