Snake | image only representative purpose (Photo credit: Pixabay)

सर्पदंशामुळे (Snakebite) मरण पावलेल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या व्यक्तीचा झोपेत साप चावल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना बलरामपूर (उत्तर प्रदेश) येथे घडली. गुरुवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. गोविंद मिश्रा (22) याचा भाऊ अरविंद मिश्रा (38) चा मंगळवारी सर्पदंशाने मृत्यू झाला होता. आपल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी गोविंद बुधवारी भवानीपूर गावात आला होता. मात्र या ठिकाणी त्याचाही सर्पदंशाने मृत्यू झाला. अधिकारी राधा रमण सिंह यांनी पीटीआयला याबाबत माहिती दिली.

सिंग यांनी सांगितले की, ज्यावेळी गोविंद मिश्रा याचा झोपेत साप चावल्याने मृत्यू झाला, त्याच वेळी घरात असलेल्या चंद्रशेखर पांडे (22) या कुटुंबातील एका नातेवाईकालाही साप चावला. चंद्रशेखरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. गोविंद मिश्रा आणि पांडे हे दोघेही अरविंद मिश्रा यांच्या अंत्यसंस्कारासाठी लुधियानाहून गावे आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

वरिष्ठ वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी गावाला भेट दिली. स्थानिक आमदार कैलाशनाथ शुक्ला यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले. शुक्ला यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले.

दरम्यान, पावसाळ्यामुळे जरी उन्हापासून दिलासा मिळत असला तरी, या काळात सर्पदंशाच्या घटना वाढतात. पावसाच्या पाण्यामुळे बिळे भरतात व त्यामुळे साप बाहेर पडतात. अशा परिस्थितीत शेतात काम करणारे बहुतांश लोक सर्पदंशला बळी पडण्याचा धोका असतो. सर्पदंश झाल्यास व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात हलवून, एएसव्ही म्हणजेच अँटी स्नेक व्हेनम देऊन रुग्णाचा जीव वाचवा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सर्पदंश झाल्यावर पहिला एक तास त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तासाभरात लस मिळाल्याने रुग्णाच्या जगण्याची शक्यता खूप जास्त वाढते. साप चावण्याची लक्षणे सामान्य आहेत, ज्यामध्ये- उलटी होणे, चक्कर येणे, थंडी, चिकट त्वचा यांचा समावेश होतो. साप चावल्यावर, ज्या जागी काळे-निळे झाले तर तातडीने वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे.