"कोरोना व्हायरसचे (Coronavirus) भीषण संकट देशावर असताना लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खऱ्या अर्थाने विरोधक कसा असावा हे दाखवून दिले आहे, त्यांनी घेतलेली भूमिका ही विधायक आहे आणि यामार्फत अशा घोर प्रसंगी सरकार, तसेच विरोधी पक्षाने काय करावे याबाबत गांधींनी ‘चिंतन शिबीर’च घेतले आहे. त्या चिंतनाचा आदर केला तर देशाला फायदाच होईल". राहुल गांधी यांच्यासाठी हे असे कौतुकाचे बोल आज शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र सामनातून (Saamana) मांडले गेले आहेत. तसेच एवढ्या मोठ्या संकटकाळात, पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि राहुल गांधी यांच्यात कोरोना संदर्भात तरी एखादी चर्चा थेट व्हावी अशी मागणी सुद्धा आज अग्रलेखातून करण्यात आली आहे. वास्तविक राहुल यांनी कोरोनाचा धोका ओळखून सरकारला आधीच इशारा दिला होता, वैद्यकीय साधनांची निर्यात थांबवण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांचं ऐकायचंच नाही हे सध्याचं सरकारी धोरण आहे, असा टोला सुद्धा या अग्रलेखातून शिवसेनेने केंद्र सरकारला लगावला आहे. Coronavirus Outbreak in India: भारतात एकूण 14,378 कोरोना बाधित तर 480 रुग्णांचा मृत्यू
सामनाच्या अग्रेलखात मांडलेले मुद्दे
"लॉक डाऊन’मुळे व्हायरसचा पराभव होत नाही. ‘लॉक डाऊन’मुळे वैद्यकीय सुविधा तयार करण्यासाठी वेळ मिळतो. म्हणून त्यातून बाहेर पडण्याची रणनिती तयार व्हायला हवी. हे गांधी यांचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे. फक्त घरी बसून हे संकट दूर होणार नाही, तर वाढणार आहे. केव्हा तरी घराबाहेर पडावेच लागेल. मात्र त्यावेळी काय याबाबतचा कोणताही ठोस कार्यक्रम आज तरी दिसत नाही. गांधी हे देश-विदेशातील डॉक्टर्स, तज्ञ यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी संवाद साधल्यावरच राहुल यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी हे जे सर्व मार्गदर्शन केले ते देशहिताचे आहे. सरकारकडून हे समोर येणे आवश्यक असते.
करोनाविरुद्ध सर्वांनी एकदिलाने लढा द्यायला हवा. भांडत बसलो तर आपल्याला यश येणार नाही. ही राहुल यांची भूमिका सर्वतोपरी देशहिताची, राजकीय शहाणपणाची आहे. पण सध्या शहाणपणाचा ठेका काही मोजक्या लोकांकडे आहे व त्यांना शहाणपणाचे अजीर्णच झाले असल्याने राहुल गांधी काय बोलतात याकडे पाहणे त्यांना कमीपणाचे वाटत असावे. राहुल गांधी यांची माहिती अधिक प्रगल्भ आहे. प्रसिद्धी माध्यमे व समाज माध्यमांनी तटस्थपणे कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा, पण राहुल गांधी यांचे ऐकणे, त्यांचे विचार पोहोचवणे हा गुन्हा ठरू शकतो.
देशात ‘लॉक डाऊन’ वाढवले आहे व ‘लॉक डाऊन’ संपल्यावर आर्थिक अराजकाच्या संकटाशी सामना करावा लागेल. त्याबाबत सरकारने काय केलं? राष्ट्र सेवा म्हणून लोकांनी घरी बसावे हे ठीक, पण राष्ट्र सेवा आणि उपासमार एकत्र नांदू शकत नाही. राहुल गांधी यांनी दोन प्रमुख विषयांना हात घातला आहे व ते सुद्धा राष्ट्रहिताशी निगडित आहेत. ‘लॉक डाऊन’ हा उपाय नव्हे, तर ‘पॉज बटन’ आहे. ‘लॉक डाऊन’ उठले की विषाणू परत त्याचे काम सुरू करेल. "
कॉग्रेस खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना संकटकाळातील पक्षाची भूमिका मांडली. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लॉकडाऊन पुरेसं नाही. वैद्यकीय चाचण्या वाढवल्या पाहिजेत, केंद्र सरकारने राज्यांना अधिक अधिकार व आर्थिक ताकद द्यायला हवी, अशी अपेक्षा राहुल यांनी व्यक्त केली होती. या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर आज सामनातून कौतुक करणारा ग्रलेख छापण्यात आला आहे.