प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारत देशात वाढताना दिसत आहे. आजच्या दिवसात (18 एप्रिल सकाळी 8 वाजेपर्यंत) देशात 14,378  कोरोना बाधित आहेत. तर 480 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संसर्गातून आतापर्यंत 2000 रुग्ण यातून पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत.  त्यामुळे सध्या 11,906 कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर गेल्या 24 तासांत 991 नव्या रुग्णांची भर पडली असून 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांची सातत्याने वाढती संख्या पाहता सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यातून रिकव्हर होणाऱ्यांची संख्याही दिलासादायक आहे. दरम्यान कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी 3 मे पर्यंत देशातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 3320 कोरोना पॉझिटीव्ह आढळले असून नवी दिल्ली 1740, तामिळनाडू मध्ये 1267 आणि राजस्थानमध्ये 1131 रुग्ण आढळून आले आहेत. अजून पर्यंत इंडियन काउंसिल मेडिकल रिसर्च यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 लाख 18 हजार 449 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येनुसार भारत देशाची विभागणी 3 झोनमध्ये करण्यात आली आहे. रेड, ऑरेंज आणि ग्रीन. झोननुसार त्या ठिकाणी विशेष पॅटर्न राबवण्यात येतील. तर कोरोनाचे हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी 20 एप्रिल नंतर काही नियम शिथिल करण्यात येतील असा अंदाज आहे. (मुंबई येथील INS Angre या नौदल तळावरील 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण)

ANI Tweet:

कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाने निर्माण झालेली कठीण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे. त्यातील एक भाग म्हणून कोरोना रुग्णांच्या चाचणीची संख्या वाढवण्यात आली आहे. मात्र त्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णसंख्येत 40 टक्क्यांनी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे वातावरण नक्कीच दिलासादायक आहे.