Sanjay Raut On PM Narendra Modi: बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला; शिवसेना खासदार संजय राऊत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र
Sanjay Raut, PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

स्वातंत्र्याचे हवन परकीयांकडूनच होते असे नाही. स्वातंत्र्यासाठी घामही न गाळणारे राज्यकर्ते म्हणून येतात तेव्हा ते स्वातंत्र्यावरच सगळ्यात निर्घृण हल्ला करतात. आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी 83 वर्षांचे रतन टाटा मुंबईहून पुण्यास पोहोचले पण, दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्यांना भेटायला जात नाहीत. बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला दुसरे काय?, अशा शब्दात शिवसेना ( Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रातील भाजप सरकार (BJP Government) यांच्यावर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. शिवसेना मुखपत्र दैनिक सामनातील (Daily Saamana 'रोखठोक' (Rokhthok) या साप्ताहित सदरात राऊत यांनी ही टोलेबाजी केली आहे.

'रोखठोक'मध्ये काय म्हटले आहे?

सध्या आपल्या देशात नक्की काय सुरू आहे ते ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना संसर्गाच्या दहशतीमुळे वर्षभर परदेशात गेले नाहीत. ते हिंदुस्थानातच आहेत, पण हिंदुस्थानातील जनतेचे किती प्रश्न या काळात सुटले? ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे कोरोनाचा नवा स्टेन्स घेऊन २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ात अवतरणार होते, पण इंग्रज हे जात्याच शहाणे असल्याने जॉन्सन साहेबांनी आता दिल्लीस येण्यास नकार दिला. वर्षभरापूर्वी प्रे. ट्रम्प हे अहमदाबादेत ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी अवतरले तेव्हा 50 लाख लोकांनी स्वागत केले. ट्रम्प व त्यांच्याभोवती असलेल्या अमेरिकन मंडळींनी कोरोनाचा प्रसार केला व निघून गेले. ते प्रे. ट्रम्प आता सत्ता गमावून बसले आहेत. (हेही वाचा, 'सामना' च्या भाषेबाबत चंद्रकांत पाटील यांनी अखेर संपादिका रश्मी ठाकरे यांना लिहिले पत्र, काय लिहिलय त्या पत्रात?)

ट्रम्प यांनी सत्ता टिकविण्यासाठी झुंडशाहीचे शेवटचे टोक गाठले. आपल्या गुंड समर्थकांना त्यांनी अमेरिकेच्या संसदेत घुसवून हिंसाचार केला. त्यात संसदेतच गोळीबार झाला. अमेरिकेच्या इभ्रतीची आणि लोकशाहीची पुरती लक्तरे त्यात निघाली. अमेरिका असेल किंवा हिंदुस्थान, आता लोकशाही ही शोभेचा आणि पोकळ डोलारा म्हणूनच उभी आहे. निवडणूक निकाल फिरवावा म्हणून ट्रम्प यांनी गयावया केली. हिंदुस्थानी लोकशाही पद्धतीत अशी गयावया वगैरे करावी लागत नाही. विरोधात उभे राहणाऱ्य़ांना नष्ट केले की काम भागते आणि निवडणुकांचे निकाल ठरवून घेतले की झाले! लोकशाही या संस्थेवरील लोकांची श्रद्धा आता पूर्ण उडाली आहे

आज देशात नक्की कोणती ‘शाही’ आहे ते कोणीच सांगू शकणार नाही. आपण मागासलेले जरा जास्तच झालेलो आहोत. देशभक्तीची नवी लस सध्याच्या राज्यकर्त्यांनी लोकांना टोचली आहे. त्या लसीचा परिणाम असा की, सध्या आपल्या देशात प्रचाराचा, विकासाचा, विचाराचा मुद्दा म्हणजे देशभक्ती हाच बनला आहे. जणू काही ‘देशभक्ती’ या शब्दाचा उदय 2014 नंतर झाला. त्याआधी शतकानुशतके देशभक्ती कशाशी खातात हे हिंदुस्थानवासीयांना माहीत नव्हते. स्वातंत्र्य संग्रामात जे सहभागी झाले व मरण पावले तेसुद्धा सध्याच्या युगात देशभक्त नसावेत. पंतप्रधान मोदी व भाजपचा जयजयकार करीत आहेत तेच देशभक्त असे आता नक्की करण्यात आले आहे. हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन यांच्यावर टीका करणारे व त्यांच्या विरोधात बोलणारेही एकतर देशभक्त नव्हते अथवा ते क्रांतीचे म्हणजे देशाचे शत्रू ठरवले गेले.

पंजाबच्या सीमेवर शेतकरी थंडी-वाऱ्य़ात कुडकुडत उभा आहे. या आंदोलनात 57 शेतकरी मरण पावले. त्यांच्याविषयी संवेदनेचा एकही चकार शब्द न काढणाऱ्य़ांचे सरकार दिल्लीत आहे. असे माणुसकी नसलेले सरकार कोणत्या ‘शाही’त बसते? टाटांसारखे लोक मोठे का? हे अशा वेळी समजते. आपला एक माजी कर्मचारी आजारी आहे हे समजताच रतन टाटा हे मुंबईतून प्रवास करीत पुण्यात गेले. त्या कर्मचाऱ्य़ाला त्याच्या छोटय़ा घरात जाऊन भेटले. त्याच्या कुटुंबास धीर दिला. प्रत्येक पिढीतले ‘टाटा’ हे भारतरत्न का झाले व अंबानी-अदानी यांना ‘टाटां’ची प्रतिष्ठा का मिळू शकली नाही त्याचे उत्तर टाटांच्या या जीवनशैलीत आहे. हे टाटादेखील सध्या मोदी नीतीचे समर्थक आहेत.

आज देश व राजकारण एका व्यक्तीभोवती फिरत आहे. लोकसभेचे तरी सार्वभौमत्व उरले आहे काय? लोकसभेच्या सार्वभौमत्वाची जागा पंतप्रधानांच्या सार्वभौमत्वाने घेतली आहे. गेल्या काही वर्षांत एकामागून एक घटनादुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या, पण दिल्लीच्या सीमेवर 45 दिवस मरत असलेल्या पंजाबच्या शेतकऱ्य़ांसाठी कायद्यात दुरुस्ती करायला सरकार तयार नाही. कृषी कायदे मागे घ्या ही शेतकऱ्य़ांची प्रमुख मागणी असेलही, पण त्यावर लोकसभेत चर्चा तरी होऊ द्या! सध्या काय सुरू आहे त्याची तुलना आणीबाणीशीच करता येईल.