Ashneer Grover (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतपेचा सह-संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि शार्क टँक इंडियाचा अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) याला फसवणुकीच्या संशयावरून कंपनीतून काढून टाकले जाण्याची शक्यता आहे. लाइव्ह मिंटमधील वृत्तानुसार, भारतपेने एक नवीन कायदा कंपनी नियुक्त केली आहे आणि ती या प्रकरणाची चौकशी करत आहे. या अहवालात प्रक्रियेशी संलग्न दोन स्त्रोतांचा उल्लेख करण्यात आला आहे व या तपासाचा निकाल दोन महिन्यांत समोर येण्याची अपेक्षा आहे. भारतपेची ‘हेड ऑफ कंट्रोल’ असलेली अश्नीरची पत्नी माधुरी जैन हिलाही काढून टाकण्यात आले आहे, असे एका सूत्राने दैनिकाला सांगितले.

भारतपेमध्ये येण्यापूर्वी माधुरीचे फॅशन बुटीक होते. याआधी अनेकदा कंपनीने पात्र CFO (मुख्य वित्तीय अधिकारी) नियुक्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रोव्हरने त्या निर्णयास विरोध केला असे सूत्राने सांगितले. परंतु कंपनीने 15 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचे नाकारले. भारतपेच्या मंडळाने सध्या तरी कोणत्याही कर्मचाऱ्याची सेवा समाप्त केलेली नाही व कोणालाही कोणत्याही पदावरून काढून टाकण्याचे सूचित करणारे अहवाल निराधार आणि असत्य आहेत असे कंपनीने म्हटले.

कंपनीने असेही म्हटले की, बोर्ड स्वतंत्र आणि संपूर्ण ऑडिट प्रक्रियेसाठी वचनबद्ध आहे आणि ऑडिट होईपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्यांनी प्रसारमाध्यमांना विनंती केली की, कोणतेही अंदाज लावू नयते आणि माहिती नसलेल्या स्त्रोतांच्या आधारे निर्णय घेऊ नयेत.

दुसरीकडे अश्नीर ग्रोव्हरवर कंपनीतून कायमस्वरूपी बाहेर पडण्यासाठी दबाव वाढत असताना, त्याने कायदेशीर मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रोव्हरने नवी दिल्लीस्थित लॉ फर्म करंजावाला अँड कंपनीशी संपर्क साधला असून, फिनटेक स्टार्टअपमधील त्याची पोस्ट कशी सुरक्षित ठेवता येईल आणि त्‍याच्‍या जवळपास 9% शेअरहोल्‍डिंगचे कसे अबाधित राहतील याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे सूत्राने सांगितले. (हेही वाचा: Economic Survey 2021-22: अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी लोकसभेत मांडला आर्थिक सर्वेक्षण अहवाल; पहा महत्त्वाचे अपडेट्स!)

दरम्यान, सध्या अश्नीरहा हा शार्क टँक इंडियामधील सात 'शार्क' पैकी एक आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा नवीन शो डिसेंबरमध्ये सुरू झाला. लेन्सकार्टचे पीयूष बन्सल, एमक्योर फार्मास्युटिकल्सची नमिता थापर, मामाअर्थची गझल अलघ, शादी डॉट कॉमचे अनुपम मित्तल, बोट (boat) चे अमन गुप्ता आणि SUGAR कॉस्मेटिक्सच्या विनीता सिंग हे इतर शार्क आहेत.