Robbery on Konark Express: पुणे जवळ कोणार्क एक्सप्रेस मध्ये दरोडा; 2 प्रवासी जखमी
A representational image. | (Image Credits: Facebook)

मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस (Mumbai-Bhubaneswar Konark Express) मधून प्रवास करणारे 2 प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवासादरम्यान पुण्याजवळ(Pune)  या ट्रेन वर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. प्रवाशांकडून सोन्याचे दागिने हिसकावताना ते जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवार, 26 ऑक्टोबरच्या रात्रीची आहे.

जीआरपी च्या माहितीनुसार, पुणे शहरापासून 75 किमी अंतरावर असलेल्या नानवीज मध्ये घटना घडली आहे. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार 3 दरोडेखोर होते. त्यांनी ट्रेनच्या स्लीपर कोचला लक्ष्य केले होते. सिग्नल यंत्रणेमध्ये काही छेडछड करून त्यांनी ट्रेन थांबलेली असताना हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

दरोडेखोरांनी कम्पार्टमेंटच्या खिडकीमधून दागिने हिसकवण्याचा प्रयत्न केला. प्रवाशाने आलार्म खेचल्याने काही जण डब्ब्यातून उतरले आणि दरोडेखोरांचा पाठलाग करू लागले. यामध्ये दगडफेकही झाल्याने 2 प्रवासी जखमी झाले होते. नक्की वाचा: मुंबई लोकल मध्ये तरूणीवर लुटण्याच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला; वसई-नायगाव स्टेशन दरम्यानची घटना.

इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना जीआरपी ने दिलेल्या माहितीनुसार, '2 जणांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरपीएफ दलाचा गार्ड असतो. त्यानुसार या घटनेच्या वेळेसही आरपीएफ गार्ड हजर होता.'