मुंबई लोकल मध्ये तरूणीवर लुटण्याच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला; वसई-नायगाव स्टेशन दरम्यानची घटना
Mumbai Local | Photo Credits: Unsplash.com

मुंबई लोकलमधून (Mumbai Local)  संध्याकाळच्या वेळेस एकटीने प्रवास करत असलेल्या 29 वर्षीय तरूणीवर हल्ला करून तिला लुटण्याचा प्रयत्न झाल्याची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ही तरूणी वसईची असून सध्या आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिस नायगाव आणि वसई स्टेशन (Vasai Station) दरम्यानचं सीसीटीव्ही फूटेज तपासून पाहत आहेत. लूटण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये तरूणीच्या डोक्यावर जखम झाली आहे. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये ही तरूणी रूग्णालयात पोहचली आणि तिला टाके घालावे लागले आहेत.

वसईची ही तरूणी कामाला सुट्टी असल्याने मैत्रिणीला भेटण्यासाठी बाहेर पडली होती. वसई स्थानकातून अंधेरी कडे जाणार्‍या स्लो लोकल मध्ये मधल्या डब्ब्यात ती एकटीच चढली. दरवाज्याच्या मागच्या बाजूला असलेल्या बाकड्यावर ती बसली. ट्रेन स्थानकातून सुटताच एक तरूण चढला आणि त्याने तिचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तिचं डोकं सातत्याने एका कडक भागावर आपटलं. तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी काही ठिकाणी आधार घेत घट्ट पकडून ठेवलं. आरोपीने तिच्या गळ्यातील चैन खेचण्याचा प्रयत्न केला मात्र ती तुटली. पण त्याने काही भाग उचलत नायगाव स्टेशन मध्ये उतरून पळ काढला.

दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेमध्येच तरूणी नायगाव स्टेशनमध्ये उतरली आणि तिने रूग्णालय गाठलं. पुढे कुटुंबाशी बोलून रविवारी वसई जीआरपी मध्ये पोलिस तक्रार नोंदवली. Mumbai: मुंबईतील शिवडी रेल्वे स्थानकावर एका माथेफिरूने दारू पिऊन घातला धिंगाणा; पोलिसांवर चाकू हल्ला केल्यानंतर रेल्वे कार्यालयाचीही केली तोडफोड.

पोलिसांनी मुंबई मिररला दिलेल्या माहितीनुसार या आरोपी बराच वेळ वसई स्टेशन वर घुटमळत होता त्याने तरूणी डब्ब्यामध्ये एकटीच असल्याचं पाहिलं आणि तिला लुटण्याचा प्रयत्न केला. हा अशाप्रकराचे गुन्हे सातत्याने करत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या या घटनेनंतर लूटण्याच्या प्रयत्नामध्ये आयपीसी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबई लोकल आता सामान्य प्रवाशांसाठी खुली झाली आहे. दरम्यान यामध्ये वेळेच बंधन घालून आता नागरिक प्रवास करू शकतात.