देशभरात आज 73 व्या प्रजासत्ताक दिनाचा (India's 73rd Republic Day 2022) मोठा उत्साह आहे. देशभर जल्लोष असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एकूणच काय तर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. राजधानी दिल्ली येथेही सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य परेड आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि लष्करांच्या तिन्ही दल प्रमुखांसह इतर मान्यवरही मोठया प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख यांचीही उपस्थीती असणार आहे. (हेही वाचा, Happy Republic Day HD Images 2022: लोकशाहीचा उत्सव प्रजासत्ताक दिन साजरा करा HD Images, Wishes, Quotes, Greetings, WhatsApp, SMS, Facebook Message शेअर करुन)
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.15 वाजता राजपथावर पोहोचतील. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे त्यांच्या ताफ्यासह आणि राष्ट्रपतींच्या घोडेस्वार अंगरक्षकांसह सकाळी 10.23 वाजता राजपथावर पोहोचतील. राष्ट्रपतींच्या पत्नीही सकाळी 10.21 वाजता राजपथावर पोहोचतील.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीत तब्बल 27 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. शिवाय 71 डिसीपी, 213 एसीपी आणि 753 पोलीस निरीक्षक सुरक्षेसाठी तैनात आहेत.