खुशखबर! 21 दिवसांच्या लॉकडाऊन काळात केंद्र सरकारकडून दिलासा; आता 80 कोटी लोकांना गहू 2 रुपये किलो व तांदूळ 3 रुपये किलो दराने मिळणार
Union Minister Prakash Javadekar. (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान लोकांनी घर सोडू नये आणि सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केले आहे. लॉकडाउननंतर आज मोदी मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक बोलविण्यात आली होती. त्याविषयी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माध्यमांना माहिती दिली. या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार, देशातील 80 कोटी लोकांना 2 रुपये किलो दराने गहू आणि तांदूळ 3 रुपये किलो दराने देण्यात येणार आहे.

इतकेच नाही तर जनतेला तीन महिन्यांचे रेशन अ‍ॅडव्हान्समध्येच देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे संपूर्ण देशाने स्वागत केले व आता लोकांनी घरातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच केंद्र सरकारकडून हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. प्रकाश जावडेकर यांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, येत्या 21 दिवसात देशातील गरजेच्या गोष्टींची दुकाने सुरु राहणार आहेत. अशा परिस्थितीत आवश्यक वस्तू घेण्यासाठी दुकानासमोर रांगा लावू नका, असेही त्यांनी सांगितले आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवस लॉकडाऊन, 'या' सुविधा राहणार सुरू; जाणून घ्या संपूर्ण यादी)

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना कमी किमतीमधील गहू व तांदळाचे वाटप केले जाणार आहे. लोकांच्या घरात धान्याचा तुटवडा राहू नये म्हणून 3 महिन्यांचे धान्य आगाऊ देण्यात येणार आहे. पीडीएस प्रणालीअंतर्गत सरकार देशभरातील 5 लाख रेशन दुकानांवर दरमहा लाभार्थ्यांना 5 किलो अनुदानित धान्य देते. सरकारने ते वाढवून 7 किलो केले आहे. राष्ट्रिय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, रेशन दुकानांत अनुदानित दराने धान्य उपलब्ध असेल. सध्या सरकारकडे 435 लाख टन अतिरिक्त धान्य आहे, त्यामध्ये 272.19 लाख टन तांदूळ, 162.79 लाख टन गहू यांचा समावेश आहे.