
Bharat Rice: गेल्या वर्षभरात भारतातील तांदळाच्या किरकोळ किमतीत (Rice Prices) वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी भारत सरकार सवलतीच्या दरात तांदूळ विकण्यास सुरुवात करत आहे. केंद्र सरकार आज ‘भारत तांदूळ’ (Bharat Rice) लाँच करत आहे. यामध्ये ग्राहकांना 29 रुपये किलो दराने तांदूळ दिला जाणार आहे. अनुदानित तांदूळ 5 किलो आणि 10 किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध असेल. गेल्या एका वर्षात तांदळाच्या किरकोळ किमतीत 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
अन्न मंत्री पियुष गोयल हे राष्ट्रीय राजधानीत कर्तव्य पथ येथे भारत तांदूळ लाँच करणार आहेत, असे अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) दोन सहकारी संस्था- नॅशनल ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) सोबत केंद्रीय भंडार 5 लाख टन तांदळाचा रिटेल चेनचा टप्पा-1 सुरू करणार आहेत.
या एजन्सी 5 किलो आणि 10 किलोमध्ये तांदूळ पॅक करतील आणि त्यांच्या आउटलेटद्वारे ‘भारत’ ब्रँड अंतर्गत किरकोळ विक्री करतील. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही तांदूळ विकला जाईल. सरकारला ‘भारत तांदूळ’ ला चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा आहे. सध्या ‘भारत आटा’ 27.50 रुपये प्रति किलो आणि ‘भारत चना’ 60 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. (हेही वाचा: PAN Aadhaar Linking: सरकारची तिजोरी झाली जड; पॅन-आधार लिंकिंगला उशीर झाल्याने नागरिकांकडून वसूल करण्यात आला 600 कोटींचा दंड)
सरकारने यापूर्वी घाऊक विक्रेत्यांना खुल्या बाजार विक्री योजनेद्वारे (OMSS) या किमतीत तांदूळ विकण्याची ऑफर दिली होती, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, आता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फतच तांदळाची किरकोळ विक्री करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, निर्यात बंदी आणि 2023-24 मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन असूनही, किरकोळ किमती अजूनही नियंत्रणात नाहीत. सरकारने किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, प्रोसेसर आणि मोठ्या किरकोळ साखळींना साठेबाजी रोखण्यासाठी त्यांचे साठे उघड करण्यास सांगितले आहे.