टोमॅटोच्या (Tomatoes) वाढत्या किमतीमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा नफा झाला आहे. मात्र यासोबतच टोमॅटो चोरी आणि लुटीच्या अनेक बातम्याही समोर येत आहेत. अशीच एक घटना कर्नाटकातील (Karnataka) कोलार येथून समोर आली आहे, जिथे राजस्थानला जाणारा 21 लाख रुपये किमतीच्या टोमॅटोचा ट्रक गूढपणे गायब झाला आहे. अहवालानुसार, हे चोरीचे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे.
आपले टोमॅटो चोरीला गेल्याच्या भीतीने व्यापाऱ्यांनी कोलार पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. माहितीनुसार, 27 जुलै रोजी कोलार एपीएमसी यार्डमधून राजस्थानमधील जयपूरला टोमॅटो घेऊन जाण्यासाठी 2 व्यापाऱ्यांनी ट्रक बुक केला होता.
टोमॅटोने भरलेला ट्रक शनिवारी रात्री उशिरा जयपूरला पोहोचणार होता. मात्र ट्रक इच्छित स्थळी पोहोचला नाही. व्यापाऱ्यांनी अनेकदा ट्रकचालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाचा मोबाईलही बंद आहे. ट्रक ऑपरेटरशी संपर्क होऊ शकला नाही, त्यानंतर कोलारच्या व्यापाऱ्यांनी गैरप्रकाराच्या भीतीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. जीपीएस ट्रॅकरनुसार, ट्रकने कोलारपासून सुमारे 1,600 किमी अंतर कापले होते, असे पोलिसांनी सांगितले. आता ट्रक क्लीनरकडे मोबाईल नसल्यामुळे ट्रक ट्रेस होत नाही. (हेही वाचा: Rs 4 Crore in 45 Days: टोमॅटो विकून शेतकऱ्याने कमावले 4 कोटी रुपये, एका झटक्यात सर्व कर्ज फेडले)
टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रक बेपत्ता झाल्याबद्दल चिंता व्यक्त करत व्यापाऱ्यांनी सांगितले की, ट्रकला अपघात झाला असता तर आतापर्यंत माहिती मिळाली असती. मात्र चालक ट्रक घेऊन पळून गेला आहे किंवा टोमॅटो चोरून नेला आहे, अशी भीती त्यांना वाटत आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर 15 किलोच्या बॉक्ससाठी 2000 रुपयांच्या आसपास आहे. त्याचबरोबर किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 150 ते 200 रुपये किलोपर्यंत वाढत आहेत. टोमॅटोने भरलेल्या या ट्रकची किंमत सुमारे 21 लाख रुपये होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.