Rats Drank Liquor: पोलीस ठाण्यात ठेवलेली दारू उंदरांनी केली फस्त; पिंजरा लावून एका आरोपीला अटक; न्यायालयात केले जाणार हजर
Rat (PC - Twitter)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छिंदवाडा (Chhindwara) कोतवालीमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे आचारसंहितेच्या काळात जप्त केलेली दारू उंदरांनी पिऊन टाकली आहे. आता पोलीस ठाण्याने उंदीर पकडण्यासाठी पिंजरा लावला असून, सध्या या पिंजऱ्यात एक उंदीर अडकला आहे. या दारुड्या उंदराला कोर्टात हजर केले जाणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर छिंदवाडा कोतवाली पोलीस ठाण्याने वेगवेगळ्या प्रकरणात 60 दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. या जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारातील इमारतीत बांधलेल्या गोदामात ठेवण्यात आल्या होत्या.

जप्त केलेली दारू न्यायालयात हजर करण्याची वेळ आली असता, किमान 60 बाटल्या रिकाम्या असल्याचे पोलिसांना आढळून आले. या बाटल्या उंदरांनी रिकामी केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. गोदामात ठेवलेल्या या दारूवर उंदरांनी डल्ला मारला आणि सर्व दारू पिऊन टाकली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर पोलिसांना गोदामात पिंजरा लावला. मात्र, आतापर्यंत या पिंजऱ्यात फक्त एकच उंदीर अडकला आहे.

छिंदवाडा कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी उमेश गोल्हानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अशी पहिलीच घटना नाही, याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ही इमारत कच्ची असल्याने अशा समस्या स्थानिक पोलिसांसमोर रोज येत आहेत. याआधी 2018 मध्ये बरेली येथील कॅन्टोन्मेंट पोलीस स्टेशनच्या गोदामात जप्त केलेली 1000 लिटरहून अधिक दारू बेपत्ता झाली होती. त्यावेळीही उंदरांनी दारू पिल्याचा आरोप स्थानिक पोलिसांनी केला होता. (हेही वाचा: UP Shocker: महिलेने आपल्या सावळ्या आणि कुरूप पतीला जिवंत पेटवून दिले, तरुणाचा मृत्यू; कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा)

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाल्यापासून अंमलबजावणी यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. आतापर्यंत संयुक्त पथकांकडून 288 कोटी 38 लाख 95 हजार 49 रुपयांची जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 31 कोटी 82 लाख 65 हजार 813 रुपयांची रोख रक्कम, 52 कोटी 22 लाख 43 हजार 636 रुपयांची 25 लाख 6 हजार 234 लिटरहून अधिकची अवैध दारू, 14 कोटी 58 लाख 84 हजार 331 रुपयांचे ड्रग्ज, 81 कोटी 29 लाख 25 हजार 884 रुपये किमतीचे मौल्यवान धातू, सोने-चांदी आणि दागिने व इतर 108 कोटी 45 ​​लाख 75 हजार 385 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.