Rajya Sabha Election Results 2020: काँग्रेसला राजस्थान मध्ये 2 जागा, गुजरात मधून भाजपला 3 जागा आणि MP, YSRCP यांचा आँध्र प्रदेशातील 4 पैकी 4 जागांवर विजय, येथे पहा निवडणूकीचा संपूर्ण निकाल
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

राज्यसभेच्या निवडणूकीचा निकाल (Rajya Sabha Election Results) आता जाहीर करण्यात आला आहे. निवडणूकीसाठी सकाळी मतदान झाले त्यानंतर आता निकाल स्पष्ट झाले आहेत. निवडणूक आयोगाने प्रथम राजस्थान मधील निकाल जाहीर केला असून येथे काँग्रेस पक्षाने 2 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. मध्य प्रदेशात राष्ट्रीय पक्षांना प्रत्येकी 1-1 जागा मिळाली आहे.

आँध्र प्रदेशात YSR काँग्रेस पक्षाची सत्ता आली असून त्यांनी 4 पैकी 4 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने या जागांवर आपले नाव कोरले आहे. वायआरएसपीच्या परिमल नथवानी, मोपीदेवी व्यंकटरामणा, पिल्ली सुभाष चंद्र बोस आणि आला अयोध्या रामी रेड्डी या उमेदवारांचा विजय झाला आहे.

राजस्थान मध्ये काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार म्हणजेच केके वेणूगोपाल आणि निरज दांगी यांचा विजय झाला आहे. भाजपकडून राजेंद्र गहलोत यांचा विजय झाला आहे.(Rajya Sabha Election 2020: राज्यसभा निवडणुकीत भाजपची तटबंदी तोडण्याचे काँग्रेस समोर आव्हान, दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेकांच्या रणनितीचा फैसला; मतदान सुरु, आजच निकाल)

मध्य प्रदेशात माजी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मार्च महिन्यात नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. त्यांचा सुद्धा राज्यसभेत आता विजय झाला आहे. भाजपचे अन्य उमेदवार- समर सिंग सोलंकी यांचा सुद्धा निवडणूकीत विजय झाला आहे. काँग्रेस पक्षातील माजी मंत्री दिग्विजय सिंग यांनी पुन्हा राज्यसभेच्या निवडणूकीत बाजी मारली आहे.

गुजरात मधील राज्यसभेच्या निवडणूकीबाबत उत्सुकता होती. भाजपला गुजरात मध्ये तीन जागांवर विजय मिळवता आला आहे. यामध्ये अभय भरद्वाज, रमिला बारा आणि नरहरी आमिन या उमेदवारांचा विजय झाला आहे.

मेघालयात सत्तारुढ नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार वानवे रॉय खारलुखी आणि काँग्रेसचे ‘केनेडी कॉर्नेलियस ख्याइम’ हे एकमेव जागेसाठी समोरासमोर उभे आहेत. मेघालयात लोकशाही आघाडीकडे 60 सदस्यीय विधानसभेत 41 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 19 आमदार आहेत.