Rajasthan Shocker: व्यक्तीने वृद्ध महिलेची हत्या करून खाल्ले तिचे मांस; आता रुग्णालयात झाला मृत्यू, जाणून घ्या सविस्तर
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

राजस्थानच्या (Rajasthan) पालीमध्ये (Pali) हत्येचे आणि मृत्यूचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका वृद्ध महिलेची हत्या करून तिचे मांस खाल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे वय 24 वर्षे आहे. आता या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पाली येथे एक व्यक्ती नरभक्षक झाल्याची घटना उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली आहे. या व्यक्तीचा मंगळवारी सकाळी एमजी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्याला महिलेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर त्याच्यावर शनिवारपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.

तपासामध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची सविस्तर माहिती पाली पोलिसांना मिळाली. त्याला गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, आरोपी हा हायड्रोफोबियाने ग्रस्त होता आणि तो रेबीज संसर्गाच्या शेवटच्या टप्प्यातून जात होता. ही अवस्था येईपर्यंत रुग्ण नरभक्षक सारखे वागू लागतो. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला एखाद्या कुत्र्याने चावा घेतला असावा आणि त्याला योग्य वेळी योग्य उपचार मिळू शकले नसावेत, असे डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळेच त्याची अवस्था नरभक्षकांसारखी झाली असावी.

हा आजार कुत्र्यासारख्या प्राण्याने चावल्यामुळे किंवा त्याच्या नखांनी ओरखडा झाल्यामुळे होतो. मात्र, पाळीव कुत्र्यांच्या चाव्यामुळे हा आजार होत नाही. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे किंवा कच्चे मांस खाल्ल्याने हा आजार होतो. याबाबत वेळीच उपचार न झाल्यास ती व्यक्ती नरभक्षक बनते. त्याचा मेंदू काम करणे बंद करतो. त्यातच समोरच्याला समजून घेण्याची किंवा माफ करण्याची बौद्धिक क्षमता संपते. डॉक्‍टरांचे म्हणणे आहे की, कुत्र्यांशिवाय वटवाघुळ आणि कोल्ह्यांच्या चाव्यामुळेही हायड्रोफोबिया होतो. रेबीजचा विषाणू अनेकदा एक ते तीन महिन्यांपर्यंत सुप्त राहतो. त्यानंतर त्याला लक्षणे दिसू लागतात.

एमजी हॉस्पिटलचे अधीक्षक राज श्री बेहरा यांनी सांगितले की, दाखल झाल्यापासून रुग्णाची प्रकृती स्थिर होती. मात्र, मंगळवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले. त्याची प्रकृती पाहता मानसोपचार आणि न्यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांनी त्याची भेट घेतली होती परंतु त्यांना त्याच्या आजाराचे निदान करता आले नाही. (हेही वाचा: Sakshi Murder Case: साहिलने दिली भीषण गुन्ह्याची कबुली, म्हणाला- 'साक्षीला मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही')

सुरेंद्र ठाकूर याला 26 मे रोजी पाली येथील सेंद्रा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या सरडाणा गावात एका वृद्ध महिलेचे मांस खाताना गावकऱ्यांनी पकडले होते. त्याला तातडीने पाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा रेबीजचा रुग्ण असल्याचा संशय आल्याने त्याला दुसऱ्या दिवशी जोधपूरला रेफर करण्यात आले. वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांच्या हाताळणीदरम्यानही, त्याने त्यांच्यापैकी काहींना चावा घेतला होता.