देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) सुरक्षेबाबत केले जाणारे मोठ-मोठे दावे फोल ठरताना दिसत आहेत. नुकतेच दिल्लीत एका 16 वर्षाच्या निष्पाप तरुणीची भरदिवसा हत्या करण्यात आली. या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून साहिल नावाच्या तरुणाने त्याची कथित प्रेयसी साक्षीची हत्या (Sakshi Murder Case) केली. आता राजधानीतील साक्षी हत्याकांडातील आरोपी साहिलने आपला गुन्हा मान्य केला आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. साहिलला सोमवारी दिल्ली पोलिसांनी बुलंदशहर येथून अटक केली.
सुरुवातीच्या चौकशीत त्याने साक्षीची निर्घृण हत्या केल्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे सांगितले. त्याच्या मते साक्षी काही दिवसांपासून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती व याच रागातून त्याने तिची हत्या केली. सध्या साहिलला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात आरोपी साहिलची अनेक मुलींशी मैत्री असल्याचे समोर आले आहे. साहिल एकाच वेळी अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होता व याची माहिती साक्षीला होती. याच कारणामुळे तिला साहिलसोबतचे नाते तोडायचे होते.
माहितीनुसार साक्षी आणि साहिल जवळपास वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते, मात्र काही कारणास्तव साक्षीला या नात्यातून बाहेर पडायचे होते. साक्षी आधी प्रवीण नावाच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती, त्यानंतर ब्रेकअप झाल्यानंतर तिचे साहिलसोबत प्रेम संबंध होते. मात्र पुन्हा एकदा ती प्रवीणच्या संपर्कात आली, इतकेच नाही तर तिने तिच्या हातावर प्रवीणच्या नावाचा टॅटूही काढला होता. या गोष्टीचा साहिलला राग येऊ लागला. शनिवारी या मुद्द्यावरून दोघांमध्ये मोठे भांडण झाले. त्यानंतर साहिलने साक्षीला मारण्याची योजना बनवली. (हेही वाचा: Delhi Shocker: दिल्लीत कापड दुकानाच्या मालकावर गोळीबार; मदतीसाठी आलेल्या मुलांवर चाकूहल्ला)
घटनेच्या दिवशी साक्षी तिची मैत्रिण नीतू हिच्या मुलाच्या वाढदिवसाला जात होती. नीतूचा नवरा सध्या तुरुंगात आहे. साहिलला नीतूच्या घरचा रस्ता माहीत होता. याच मार्गावर तो साक्षीची वाट पाहत होता. साक्षी तिथे पोहोचताच साहिलने तिच्यावर चाकूने हल्ला केला व त्याने साक्षीला दगडाने ठेचून मारले. यामध्ये तिचा मृत्यू झाला. अटकेनंतर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी साहिलने शाहाबाद डेअरी परिसरातील जेजे कॉलनीत राहणाऱ्या साक्षीवर 16 हून अधिक वेळा हल्ला केला.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला साहिल तरुणीवर चाकूने वार करताना दिसत आहे. जवळपास सात ते आठ लोक तिथे उपस्थित होते, परंतु ते मृत्यूचा तमाशा बघत राहिले. निरपराध साक्षीला वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. उपस्थित लोकांनी साहिलला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तर कदाचित साक्षीला वाचवता आले असते.