राजस्थानच्या अलवर (Alwar) जिल्ह्यातील रैनी पोलीस स्टेशनच्या नांगलबास गावात पत्नीच्या रील (Reels) बनवण्याच्या सवयीमुळे त्रासलेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही पत्नी सोशल मिडियावर बरीच सक्रीय होती व वरचेवर ती रील बनवायची मात्र तिच्या रील्सला अनेकदा अश्लील तसेच असभ्य भाषेत कमेंट्स यायच्या. यालाच कंटाळून पतीने हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी पतीने लाइव्ह येऊन रीलवर असभ्य कमेंट करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आणि तुमच्या घरात असे काही घडल्यावर कळेल, असे सांगितले. ही बाब 5 एप्रिलची आहे.
6 एप्रिल रोजी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये पत्नीच्या रीलवरील असभ्य कमेंट्सबाबत पतीने भाष्य केल्याचे दिसून आले. ज्यामध्ये पती सांगत होता की, ‘चांगले पुरुष कधीही अशा कमेंट करत नाहीत.’ आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी त्याने हा व्हिडिओ बनवला होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, हा व्हिडिओ जुना असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
रिपोर्टनुसार, सिद्धार्थ दौसा, वय 31 असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. रैनीचे एसएचओ प्रेमलता वर्मा यांनी सांगितले की, मृत सिद्धार्थ यांच्या कुटुंबीयांनी 6 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. सिद्धार्थ येथील आरोग्य विभागात एलडीसी म्हणून काम करत होता. दीड वर्षांपूर्वी तो वडिलांच्या जागी अनुकंपा नोकरीवर रुजू झाला होता. सिद्धार्थची पत्नी रील बनवायची यामुळे तो नाराज होता. पत्नीच्या रील्सवर लोक त्याला अश्लील कमेंट करून चिडवायचे. यावरून सिद्धार्थ आणि त्याची पत्नी माया यांच्यात भांडण सुरू होते. त्यांनी यापूर्वीही एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. आता सिद्धार्थने या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. (हेही वाचा: UP Crime: संतापजनक! थकीत असलेली 800 रु. मजूरी मागितली म्हणून तरुणाला घरात कोंडून मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद)
व्हिडिओमध्ये सिद्धार्थ म्हणतोय, ‘मी आजपर्यंत कधीही रील बनवली नाही, मात्र आज मला हा व्हिडिओ बनवायला भाग पाडले गेले. माझ्या पत्नीशी माझे वैयक्तिक भांडण नाही. मात्र तिच्या रील्सवर येणाऱ्या कमेंट्सना मी कंटाळलो आहे. हे तुमच्या घरात घडल्यावरच तुम्हाला समजेल. मी माझे कुटुंब तुटू देणार नाही. यासाठी मी माझा जीव देऊ शकतो.’ व्हिडिओवरून दिसून येत आहे की, सिद्धार्थ आणि त्याच्या पत्नीमधील संबंध चांगले नव्हते व पत्नीचे सोशल मिडियाच्या नादात आपला पती व कुटुंबाकडे दुर्लक्ष होत होते.