Rajasthan Political Crisis: भाजपच्या कृतीमुळे लोकशाहीचे वाळवंट होईल- शिवसेना
Rajasthan Political Crisis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेसच्या अंतर्गत भांडणात टांग टाकून घोडेबाजारास उत्तेजन देण्याचे काम राजस्थानात सुरु आहे. वाळवंटात राजकीय उपद्व्याप करुन वादळ निर्माण करुन भाजप (BJP) काय साधणार आहे? अशाने संसदीय लोकशाहीचे वाळवंट (Desert) होईल. भाजपकडे देशाची पूर्ण सत्ता आहे. काही घरे त्यांनी विरोधकांसाठी सोडायला हवीत यातच लोकशाहीची शान आहे, अशा शब्दात जुना मित्र असलेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्षाने भाजपला सल्ला दिला आहे.

वाळवंटातील उपद्व्याप या मथळ्याखाली शिवसेना मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामना संपादकीयामध्ये राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. सामना संपादकीयामध्ये म्हटले आहे की, विरोधकांची सरकारे अस्थिर करायची या सूत्राने केंद्रीय सत्ता काम करीत आहे. देशापुढे कोरोनामुळे कोसळलेली अर्थव्यवस्था, लद्दाखमधील चिनी घुसखोरी, असे अनेक प्रश्न आहेत. लद्दाखमध्ये 20 सैनिकांचे सांडलेले रक्त अजून ताजे आहे. असे असताना हे प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला, काँग्रेसच्या अंतर्गत भांडणात टांग टाकून घोडेबाजार

उत्तेजन देण्याचे काम राजस्थानात सुरु आहे. (हेही वाचा, 'कोरोनातून सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब, प्रवचने नकोत'; सामना च्या अग्रलेखातून शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांना टोला)

देश कोरोना संकटाशी झुंजत असताना भारतीय जनात पक्षाने काही वेगळेच उपद्व्याप सुरु केले आहेत. या काळात भाजपने मध्य प्रदेशातील काँग्रेसच कमलनाथ सरकार पाडले. आता जिभेला लागलेले हे रक्त पचण्याआधीच राजस्थानातील गेहलोत सरकार पाडून ढेकर देण्याच्या स्थितीत भाजप दिसत आहे. पण ते शक्य होईल असे दिसत नाही.

राजस्थान विधानसभेत जोपर्यंत आमदारांची डोकी नीट मोजली जात नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पक्ष उघडपणे पुढे येऊन काीह करणार नाही. त्यासाठी भारतीय जनता पक्ष उघडपणे काीहच करती नसून त्यांचे सरकार अस्थिर करण्याचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागून चालले आहे, असा घणाघातही शिवसेना मुखपत्र सामना संपादकीयातून करण्या आला आहे.