![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/07/9-1-380x214.jpg)
संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात अडकलेला असताना दुसरीकडे राज्यातील राजकारणही चांगलचं तापतय. यामुळे विरोधी पक्षावर निशाणा साधत शिवसनेने (Shivsena) सामनाच्या (Saamna) अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला आहे. 'कोरोनातून सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब, प्रवचने नकोत' असे सांगत सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे असेही सामनाच्या अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.
तसेच विरोधकांची सरकारवर टिका ही गोष्ट काही नवी नाही. मात्र सद्य कोविड-19 महामारीमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा एकत्र या काम करूया असे वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. "कोरोना हे शंभर वर्षांतले सर्वात मोठे संकट आहे अशी नवी दुर्मिळ माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनीदेखील आता दिली. करोनामुळे उत्पादन, नोकऱ्या तसेच आरोग्यावर अभूतपूर्व असा नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे, असेही दास म्हणतात. या सगळ्या नकारात्मक परिणामांतून जनता सध्या जात आहे. त्यातून सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब. आता प्रवचने नकोत,” असा टोला शिवसेनेने फडणवीसांना सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे. 'स्वत:च मारुन घ्यायचे आणि स्वत:च रडायचे' शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टिकेला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
“आज धारावीतून कोरोना पूर्णपणे हटला असा दावा नाही, पण त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले हे जागतिक आरोग्य संघटनेने कबूल केले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व करोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे, पण ‘‘धारावीत जे कोरोनावर यश मिळालं ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच!’’ असा नवा प्रचारी फंडा राबवला जातोय. हा जरा अतिरेकच झाला. पांढ-या कपड्यांतील देवदूतांचा अपमान आहे. म्हणजे काही चांगले घडले की, आमच्यामुळे! रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला आमच्यामुळे. हे असले प्रकार यांना संकटसमयी सुचतात तरी कसे?” अशी टीका शिवसेनेने केली आहे.
“संघाचे काम चांगले नाही असे कोणी म्हणणार नाही, पण धारावीतील करोना नियंत्रणाच्या कार्यात सर्वच यंत्रणांनी मेहनत घेतली आहे. हे यश सामुदायिक आहे, मात्र त्यातही मुंबई महापालिकेचे काम मोठे आहे हे तुम्ही मान्य करणार की नाही? दिल्ली, उत्तर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड वगैरे भागांत स्वयंसेवकांचे अस्तित्व आहे, मग तेथे संघ धारावीप्रमाणे दक्ष का नाही? त्यामुळे संघाला करोना युद्धात उगाच ओढण्याचे कारण नाही. प्रत्येक जण आपापल्या कुवतीने लढतो आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.