'स्वत:च मारुन घ्यायचे आणि स्वत:च रडायचे' शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टिकेला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
BJP Leader Devendra Fadnavis | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे (Coronavirus) संकट वावरत असताना सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचा राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. तसेच विरोधकांनी सरकार पडायचे स्वप्न डोक्यातून काढून टाकावे. सध्या राज्याची घडी नीट बसू द्या, त्यानंतर आम्हीच त्यांना सांगू आता सरकार पाडायच्या कामाला लागा, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला होता. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. स्वत:च मारुन घ्यायचं आणि स्वत:च रडायचे, ही एक नवी पद्धत आहे. ही पद्धत जर अवलंबली तर आपल्या अपयशापासून लोकांची नजर बाजूला होते. त्यामुळे तसाच हा प्रकार आहे. कुणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या या संकटात राजकारण केले जात आहे. सरकार पाडायचा प्रयत्न होतोय, ही ती वेळ नाही असे संजय राऊत म्हणाले होते. त्याबद्दल विचारले असता फडणवीस यांनी सांगितले की, “स्वतःच मारून घ्यायचे आणि स्वतःच रडायचे, ही एक नवीन पद्धत आहे. ती पद्धत जर अवलंबली तर आपल्या अपयशापासून लोकांची नजर बाजूला होते. त्यातलाच हा प्रकार आहे. कोणीही सरकार पाडत नाही. आपणच कांगावा करायचा, त्याच्यावर मुलाखती करायच्या, त्याच्यावरच बोलायचे, जेणेकरून कोरोनाचे प्रश्न दूर होतील, असा हा प्रयत्न आहे. मला वाटते त्यांनी कोरोनाकडे लक्ष द्यायला हवे, असे बोलत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. हे देखील वाचा- मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कोरोना संबधित चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह; राजभवनात 18 कोरोना रुग्ण आढळल्यावर दिली माहिती

संजय राऊत काय म्हणाले?

अनेक राज्यकर्ते आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांनी आणखी कठोरपणे काम केले पाहिजे. या सगळ्यातून राजकारण दूर राहिले पाहिजे. पण, काही ठिकाणी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सरकार पाडणे हे कोरोना काळातील काम नाही, असे संजय राऊत म्हणाले होते. महाभारताचे युद्ध 21 दिवस चालले होते. मात्र, आता शंभर दिवस उलटून गेले तरी कोरोनाशी युद्ध सुरु आहे. ही वेळ राजकारण करण्याची वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची वेळ आहे असे देखील संजय राऊत म्हणाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाली आहे. पवारांनी ‘सामना’ला नुकतीच एक विशेष मुलाखत दिली असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक म्हणून ही मुलाखत घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून राऊत यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन या मुलाखतीचे प्रोमो पोस्ट करण्यात येत होते.