50 पैसे नोटीस (Photo Credits: ANI)

जनधन खात्याबाबत (Jan Dhan Account) राजस्थानमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक एसबीआयने (SBI) एका ग्राहकाला नोटीस पाठविली आहे, हे वाचून तुम्हाला वाटले असे की, नोटीस तर पाठवली आहे त्यात काय इतके मोठे? मात्र जनधन खात्यात 50 पैसे जमा करण्यासाठी ग्राहकाला ही नोटीस पाठविली गेली आहे, होय फक्त 50 पैसे. वेळेत पैसे जमा न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही या नोटीसमध्ये नमूद केले आहे. जिथे बँकांचे करोडो रुपये घेऊन लोक देश सोडून पळून जातात, तिथे 50 पैशांबाबतच्या या नोटीशीबद्दल चर्चा सुरु आहे.

राजस्थानमधील झुंझुनूच्या एका शाखेत जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीचे जनधन खाते आहे. जितेंद्रने या खात्यात एकूण 124 रुपये जमा केले आहेत. 12 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता बँकेने जीतेंद्रला नोटीस पाठविली. या नोटीसमध्ये त्यांना 50 पैसे देण्यास सांगितले. या अहवालांमध्ये जीतेंद्र यांना शनिवारी लोक अदालतमध्ये 50 पैसे जमा करावेत असे नमूद केले होते. तसे न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही म्हटले आहे. बँकेच्या या सूचनेनंतर जितेंद्रचे वडील शनिवारी लोकअदालतमध्ये पोहोचले. पाठीच्या समस्येमुळे जितेंद्रला लोक अदालतमध्ये जाणे शक्य झाले नाही.

(हेही वाचा: SBI चे ग्राहकांना आवाहन; चुकूनही 'या' सुचनांकडे करू नका दुर्लक्ष)

पीडित ग्राहक जितेंद्र यांचे वडील विनोद सिंग यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ते सकाळपासून अधिकाऱ्यांकडे पैसे जमा करण्यासाठी फिरत होते, परंतु बँक अधिकाऱ्यांनी पैसे जमा करून घेण्यास नकार दिला. त्याचवेळी जितेंद्र यांचे वकील विक्रम सिंह म्हणाले की, ज्या प्रकारे एसबीआय बँक अधिकाऱ्यांनी 50 पैसे जमा करण्यास नोटीस पाठवली आहे, त्यामुळे आता बँकेविरूद्ध कायदेशीर कारवाई व मानहानिचा दावा दाखल केला जाणार आहे.