देशभरात 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (State Bank Of India) या बँकेच्या ग्राहकांची ऑनलाइन फसवणुक होण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या आठवड्यात एसबीआयच्या अनेक ग्राहकांची फसवणुक झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे बँकेने आता आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट केलं आहे. या आधीही बँकेने ग्राहकांना सुचना दिल्या होत्या. ग्राहकांनी आपल्या कार्डच्या संबंधीत कोणतीही माहिती इतरांना देऊ नये, असं एसबीआयने सांगितलं आहे. तसेच तुमच्या बँक खात्याशी संबंधित माहितीची सुरक्षा तुमच्याच हातात आहे, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) म्हटलं आहे. सध्या आरबीआयने #RBIKehtaHai या स्वरुपाचा हॅशटॅगही सुरू केला आहे.
आपल्या बँक खात्याची माहिती, पासवर्ड, पिन, ओटीपी, सीव्हीव्ही, युपीआय-पिन इत्यादी फक्त स्वत:कडेच ठेवा. इतर कोणालाही ही माहिती देऊ नका. जागृत व्हा तसेच सावध रहा. तुमच्या बँक खात्यात काही गडबड झाल्याचं लक्षात अल्यास त्वरित बँकेला कल्पना द्या. तुमच्याकडून लवकर माहिती मिळाल्यास बँकेकडून लगेच कार्यवाही करण्यात येईल. तुमच्या खात्यावरून नकळत पैसे काढल्याचा मेसेज आल्यास त्वरीत बँकेला कळवा, असंही एसबीआयने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एसबीआयने ट्विट -
#RBIKehtaHai that prompt action on your part ensures immediate action on our part. Stay alert for any unauthorized activity in your account and notify us immediately.#SBI #StateBankofIndia #RBIKehtaHai pic.twitter.com/NiUEKfPPO1
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 9, 2019
आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडावेत यासाठी सरकारकडून तसेच बँकांकडून ऑनलाईन बॅंकिंग आणि डिजिटल पेमेंटला चालना देण्यात येत आहे. मात्र, यामध्ये ग्राहकांची फसवणूक करून सायबर हल्ले करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. सध्या आयटी रिफंड मिळवण्याच्या आमिष दाखवत नागरिकांना गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यापासून सावध रहा, अशा आशयाचा एक मेसेज मागील आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडियाकडून देण्यात आला होता. आयकर विभाग आयटी रिफंड थेट करदात्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो. त्यामुळे फसव्या लिंक्स आणि मेसेजपासून दूर राहण्याचं आवाहनही बँकेने केले आहे.