'राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही,' भाजप खासदार Brijbhushan Sharan Singh यांचा इशारा
BJP MP from Kaiserganj, Brij Bhushan Sharan | File Image | (Photo Credits: PTI)

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी 5 जून रोजी ते अयोध्या (Ayodhya) दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (MP Brijbhushan Sharan Singh) यांनी ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. 2008 मध्ये उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकेबद्दल राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा मी त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही.’

ब्रिजभूषण पुढे म्हणाले की, मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली आहे की, राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांना भेटू नये.’ ते पुढे म्हणाले, ‘आम्ही 2008 पासून पाहत आहोत, राज ठाकरे नेहमीच ‘मराठी माणसा’चा मुद्दा समोर घेऊन येतात. परंतु मुंबईच्या विकासात 80% वाटा अशा लोकांचा आहे जे त्या शहरातील नाहीत. ठाकरे यांनी आपली चूक सुधारली पाहिजे.’

मनसे प्रमुखांनी 5 जून रोजी रामलल्लाचे दर्शन घेण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्रापासून ते उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंनी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागितल्यानंतरच राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश दिला जाईल, असे सांगितले आहे.

याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील रस्त्यांवर 'चलो अयोध्या'चे पोस्टर लावले होते. त्याद्वारे जून महिन्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या अयोध्या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पोस्टरच्या शीर्षस्थानी जय श्री राम लिहिले आहे. त्यानंतर मी धर्मांध नाही, धार्मिक आहे असे लिहिले होते.  हे पोस्टर्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ लावण्यात आले आहेत.

महत्वाचे म्हणजे अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. योगी आदित्यनाथ यांची प्रशंसा करणारे ट्विट करत ‘तिथे योगी आहेत महाराष्ट्रात भोगी आहे’ असे त्यांनी म्हटले होते. याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते की, ‘आम्हाला हिंदुत्व उधार घ्यायची गरज नाही, हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. आम्हाला कोणीही हिंदुत्व शिकवू नये. ज्यांनी भगव्या कपड्यांचा अपमान केला, तेच आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत.’ (हेही वाचा: 'मनसेच्या आंदोलनामुळे हिंदूंचे अधिक नुकसान, मुंबईमधील 2,404 मंदिरे लाऊडस्पीकर वापरू शकणार नाहीत'- काँग्रेस नेते Sachin Sawant)

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अयोध्येला जाण्याच्या तयारीत आहेत. याबाबत माहिती देताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.