Rain | representative pic- (photo credit -pixabay)

Rainfall in India: हवामान विभागाने भारतातील पर्जन्यमान आणि वातावरण कसे असेल याबाबत अंदाज (India Weather Forecast) वर्तवला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि इतर विविध राज्यांमध्ये पुढच्या पाच दिवसांमध्ये पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज वर्तवला आहे. खास करुन 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान देशात वरुनराजा बरसू शकतो. अर्थात त्याचे प्रमाण नेहमीप्रमाणे कमी अधीक राहील. वायव्य भारतात उत्तराखंड, उत्तर प्रदेशचा पुर्वेकडील भागात पर्जन्यवृष्टी संभवते, असा आयएमडीचा अंदाज म्हणतो.

ईशान्य भारताच्या बाबतीत हवामानाचा अंदाज दर्शवतो की, रुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. काही भागांमध्ये मुसळधार पाऊसही अपेक्षीत आहे. पूर्व भारताबद्दल बोलायचे तर साधारण 10 ते 16 ऑगस्ट दरम्यान बिहारच्या उत्तरेकडील भागात बऱ्यापैकी पाऊस पडेल. पश्चिम बंगाल, सिक्कीम आदी राज्यांमध्ये 12 ऑगस्टला पाऊस संभवतो. दरम्यान, वायव्य भारताच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम विखुरलेला/ बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय मध्य, पश्चिम आणि दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशांमध्ये कमी पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात साधारण 13 ऑगस्टपासून तयार होत असलेले पोषक वातावरण पावसासाठी फलदायी ठरले. परिणामी 15 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सरी बरसू लागतील, असा अंदाज आहे. अलिकडील काही वर्षांमध्ये निसर्गाचे गणित बदलले आहे. त्यामुळे पर्जन्यवृष्टीचे प्रमाण असमान तर आहेच. परंतू त्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी शून्य प्रमाणात पाऊस बरसत आहे. वास्तविक पाहता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी दाखल होणारा मान्सून यंदा प्रत्यक्षात जुलै महिन्याच्या मध्यावर उपस्थित झाला. पण पुढचे केवळ एकदोन आठवडे नाममात्र बरसून तो ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात गायब झाला. पावसाचा जोर पूर्ण ओसरला.