Super Tatkal Pro App द्वारे IRCTC पेक्षाही अधिक वेगाने रेल्वे बुकींग केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. आयआयटी खडगपूर (IIT Kharagpur) येथील एका पधवीधराने एक असे अॅप बनवले आहे. या व्यक्तीस फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे अॅप तयार करणारा व्यक्ती तुरुपूर येथील रहिवासी आहे. एस युवराजा (S Yuvarajaa) असे त्याचे नाव आहे.
टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, एस युवराजा (S Yuvarajaa) याने ‘Super Tatkal’ आणि ‘Super Tatkal Pro’ अशी दोन अॅप बनवली होती. जी आयआरसीटीपेक्षाही अधिक वेगाने बुकींग करत असत. विशेष म्हणजे हे अॅप इतके प्रसिद्ध झाले की, अल्पावधीच या अॅपचे तब्बल एक लाख युजर्स झाले.
‘Super Tatkal’ आणि ‘Super Tatkal Pro’ ही दोन अॅप बणविणाऱ्या या महाभागावर रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी ग्राहकांना एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवून IRCTC प्रणालीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. दक्षिण रेल्वे मुख्यालय (चेन्नई) मध्ये आरपीएफ सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तिरुप्पूर रेल्वे सुरक्षा दलाच्या सहाय्याने या नव्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एस युवराजा (S Yuvarajaa) याला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा, Amazon च्या वेबसाईट आणि अॅपवरही IRCTC च्या तिकीट बुकींगची सुविधा; पहा, कसे कराल ऑनलाईन तिकीट बुकींग?)
दक्षिण रेल्वेने या प्रकाराबाबत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, एस युवराजा (S Yuvarajaa) याने उच्च शिक्षण घेतले आहे. त्याने अन्ना विद्यापीठातून बीई (Aeronautics) चे शिक्षण घेतले आहे. तसेच, आयआयटी खडगपूर येथून एम.टेक (एयरोस्पेस) केले आहे. असे असताना या व्यक्तीने अशा प्रकारे फसवणूक करणारे अॅप तयार करावे याचे आश्चर्य वाटते. दक्षिण रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त बीरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे की, संबंधित युवकाने अत्यंत वेगाने तिकीट बुक करण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले होते. तसेच, हा व्यक्ती आयआरसीटीचा अधिकृत एजंटही नव्हता.
IRCTC च्या माध्यमातून जर रेल्वे बुकींग करायचे असेल तर अनेकांसाठी ती एक डोकेदुखी असते. आयआरसीटी बुकींग करताना प्रक्रिया इतकी हळूवार होते की बुकींग करणारे प्रवासी हैरान होऊन जातात, असा अनुभव अनेक प्रवासी व्यक्त करतात.