धक्कादायक! तिसरीही मुलगीच होण्याची पतीला होती भीती; गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये केले बारीक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एका खुनाची काळीज हादरवून टाकणारी घटना समोर येत आहे. रायबरेली (Raebareli) येथे राजेंद्र नावाच्या व्यक्तीला पत्नीची, उर्मिलाची क्रूरतेने हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपीने गळा आवळून आपल्या 27 वर्षीय गर्भवती पत्नीची हत्या केली, त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि चक्क मिक्सरमध्ये वाटून टाकले.

त्यानंतर त्यांना आग लावून ते शहराच्या बाहेर फेकून दिले. तिसरीही मुलगी होईल याची कुणकुण आरोपीला लागली होती, त्याच भीतीतून त्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 4 जानेवारी रोजी घडली होती, परंतु मंगळवारी हे प्रकरण उघडकीस आले.

मृत महिला उर्मिलाची मोठी मुलगी जेव्हा आपल्या आजोबांच्या घरी पोहोचली, तेव्हा तिने घडलेल्या संपूर्ण घटनेविषयीची माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या कुटूंबाने पोलिसांत तक्रार दिली आणि पोलिसांनी कारवाई करत आरोपी पती रवींद्र कुमार (वय 35) याला अटक केली. विशेष बाब म्हणजे या मृत्युच्या 6 दिवसानंतर, 6 जानेवारी रोजी पती रवींद्रने पोलिस ठाण्यात आपली पत्नी हरवल्याची तक्रार केली होती.

2011 साली उर्मिलाने रवींद्रशी लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुली असून त्यांचे वय अनुक्रमे सात आणि अकरा वर्षे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्रला कुटुंबात मुलगा हवा होता आणि त्याला शंका होती की उर्मिला पुन्हा एका मुलीलाच जन्म देईल. याच बाबतीत घडलेल्या भांडणानंतर, रवींद्र कुमार याने आपले वडील आणि भाऊ यांच्या मदतीने उर्मिलाला गळफास लावला. नंतर मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून जाळून टाकले. पुढे त्यांचे अवशेष जवळच्या कालव्यात टाकून दिले. (हेही वाचा: धक्कादायक! मुंबई येथील गोरेगाव परिसरात ५५ वर्षीय पत्नीची हत्या करुन ६० वर्षीय पतीची आत्महत्या)

घटनेसंदर्भात पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. सुमारे सहा दिवसांच्या प्रदीर्घ तपासानंतर पोलिस पथकाला याबाबत बुधवारी यश आले व पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी केलेल्या कृत्याची कबुलीही दिली आहे.