
रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच रेल्वे प्रवाशांना ट्रेनमध्ये ‘शुद्ध शाकाहारी’ (Pure Veg) जेवण मिळणार आहे. ही सुविधा निवडक मार्गांवरच उपलब्ध असेल. अशाप्रकारे आयआरसीटीसी (IRCTC) काही गाड्यांना 'सात्विक प्रमाणित' करून ‘व्हेजिटेरियन फ्रेंडली’ प्रवासाला प्रोत्साहन देण्याची योजना आखत आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एजन्सी आणि त्याच्या विक्रेत्यांद्वारे प्रदान केलेले खाद्यपदार्थ हे पूर्णतः शाकाहारी असतील. भारतीय सात्विक परिषदेने (SCI) ही माहिती दिली आहे.
विशेषत: धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांना SCI 'सात्विक प्रमाणपत्र' दिले जाईल. IRCTCची वंदे भारत एक्सप्रेस ही दिल्ली ते वैष्णोदेवी कटरा दरम्यान धावते. या गाडीला 'सात्विक प्रमाणपत्र' दिले जाईल. याशिवाय इतर पवित्र ठिकाणी जाणाऱ्या आणखी काही गाड्यांनाही हे प्रमाणपत्र मिळवून देण्याचा निर्णय आयटीसीटीसीने घेतला आहे. भारतीय सात्विक कौन्सिल ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाराणसीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनसह आणखी 18 ट्रेनमध्ये हे प्रमाणपत्र देण्याची योजना आहे.
भारतीय सात्विक परिषदेने सांगितले की सोमवारी IRCTC च्या सहकार्याने 'सात्विक' सर्टिफिकेशन स्कीम सुरू केली जाईल. यासोबतच शाकाहारी किचनसाठी एक पुस्तिकाही विकसित करण्यात येणार आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या केवळ ट्रेनलाच नाही तर, प्रवाशांसाठी तयार केलेले किचन, दिल्ली आणि कटरा येथे प्रवाशांसाठी असलेले लाउंज आणि जिंजर हॉटेलच्या एका मजल्यालाही सात्विक प्रमाणपत्र देण्याची योजना आहे. (हेही वाचा: Indian Railway: जुन्या तिकिट दरात सुरु होणार 1700 पेक्षा अधिक ट्रेन पण कोरोनाचे नियम पाळणे अनिवार्य)
दरम्यान, आजपासून काशी महाकाल एक्स्प्रेस सुरू होत आहे. ही ट्रेन वाराणसी ते इंदूर दरम्यान धावते. वाराणसी वरून इंदूरला जाणारी ट्रेन (क्रमांक 82404) 14 नोव्हेंबर रोजी निघेल. त्याच वेळी, 15 नोव्हेंबर रोजी इंदूरहून वाराणसीसाठी परतीच्या दिशेने ट्रेन (क्रमांक 82403) सुटेल. प्रवाशांसाठी या ट्रेनच्या तिकीट बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे.