Punjab's Toxic Liquor Deaths: पंजाबमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 86 वर; 2 DSP, 4 SHO सोबत 7 अधिकारी निलंबित, आतापर्यंत 25 जणांना अटक
Alcohol | Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

पंजाब (Punjab) गेले अनेक अनेक वर्षे राज्यातील मादक पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येशी झगडत आहे. अशात विषारी दारू (Toxic Liquor) प्यायल्याने पंजाबमध्ये आतापर्यंत 86 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील अमतृसर, तरणतारण आणि बटाला या तीन जिल्ह्यात नकली दारूचे मद्यपान केल्यामुळे या लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी तातडीने कारवाई करत घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी 3 जिल्ह्यांमधील सुमारे 100 बनावट दारूच्या ठिकाणी छापा टाकून आतापर्यंत 25 लोकांना अटक केली आहे.

विषारी दारू प्रकरणातील 4 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. खास गोष्ट म्हणजे त्यातील दोन महिला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन महिला या अपघाताच्या मुख्य सूत्रधार आहेत. शनिवारपर्यंत राज्यात 86 लोकांचा मृत्यू झाला, ज्यापैकी तरनतारनमध्ये 63, अमृतसर ग्रामीणमध्ये 12  आणि गुरदासपूर (बटाला) मध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कारवाई करत, 2 डीएसपी आणि 4 एसएचओ सोबत 7 उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यासह मुख्यमंत्र्यांनी दारूच्या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. (हेही वाचा: Visakhapatnam: विशाखापट्टणम येथे मोठा अपघात; हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळून 11 कामगारांचा मृत्यू (Video))

‘ट्रिब्यून’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये त्रिवेणी चौहान आणि दर्शन राणी उर्फ ​​फौजा यांचा समावेश आहे. या दोघींच्याही मुलांना अटक करण्यात आली आहे. बटाला येथील हाथी गेट परिसरात राहणार्‍या एका व्यक्तीने सांगितले की, दोन्ही महिला संपूर्ण घटनेच्या सूत्रधार आहेत. या दोघीही गेल्या 30 वर्षांपासून अवैधपणे मद्य विक्री करीत होत्या.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील विषारी दारूच्या दुर्घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी असा दावा केला की, गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारूसंबंधित कोणतेही प्रकरण स्थानिक पोलिसांनी सोडवले नाही. पंजाबमध्ये केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी विरोधात आहे.