पंजाबचे मुख्यमत्री भगवंत मान यांना लेप्टोस्पायरोसिस संसर्ग | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Punjab CM Diagnosed Leptospirosis: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) या दुर्मिळ जिवाणूजन्य संसर्गाचे निदान झाले आहे. ज्यामुळे त्यांची फुफ्फुसे आणि मूत्रपिंडांसह महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. त्यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी पुष्टी केली आहे की मान यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात, फोर्टिस येथील कार्डिओलॉजीचे संचालक आणि प्रमुख डॉ. R.K. जसवाल यांनी म्हटले की, मान (Bhagwant Mann) यांच्या प्रकृतीने क्लिनिकल पॅरामीटर्समध्ये लक्षणीय सुधारणा दर्शविली आहे. "फुफ्फुसीय धमनीवरील वाढीव दाबावरील उपचारांना मुख्यमंत्र्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे सर्व अवयव स्थिर आहेत आणि त्याच्या रक्त चाचण्यांनी लेप्टोस्पायरोसिसच्या उपस्थितीची पुष्टी केली आहे.

भगवंत मान यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या

वयवर्षे 50 असलेल्या मान यांना रुग्णालयात बुधवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीमध्ये ही केवळ 'नियमित आरोग्य तपासणी' असल्याचे म्हटले होते. दरम्यान, शुक्रवारी त्रास वाढल्यानंतर मान यांच्या हृदयाशी संबंधित अनेक चाचण्या करण्यात आल्या. ज्यामध्ये फुफ्फुसीय धमनी दाबात वाढ झाल्याचे पुढे आले. ज्यामुळे डॉक्टरांना त्यांना उष्णकटिबंधीय संसर्ग झाला असावा, असा संशय आला. त्यानंतरच्या रक्त चाचण्यांमध्ये लेप्टोस्पायरोसिस संक्रमण झाल्याचे आढळून आले.

दरम्यान, रुग्णालयाने दिलेल्या निवेदनामध्ये डॉ. जसवाल यांनी सांगितले की, मान यांना प्रतिजैविके लिहून देण्यात आली आहेत आणि त्यांची वैद्यकीय लक्षणे आणि चाचणीच्या निकालांमध्ये समाधानकारक सुधारणा दिसून आली होती. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, अतिरिक्त चाचणी निकालांचा आढावा घेतल्यानंतर पुढील उपचार निर्णय घेतले जातील. (हेही वाचा, Punjab CM Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली)

भगवंत मान यांची प्रकृती स्थिर

लेप्टोस्पायरोसिस हा एक अत्यंत दुर्मिळ जिवाणूजन्य संसर्ग आहे. जो सामान्यतः संक्रमित प्राण्यांच्या मूत्राने दूषित झालेल्या पाण्याच्या संपर्कातून पसरतो. त्वरित उपचार न केल्यास यकृत, मूत्रपिंड आणि फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते. या संसर्गामुळे फुफ्फुसाच्या समस्या देखील उद्भवू शकतात, ज्या मान यांनी दाखल केल्यावर प्रदर्शित केल्या. प्रकृती गंभीर असूनही मान यांची सर्व महत्त्वाची लक्षणे स्थिर आहेत यावर रुग्णालयाने भर दिला. "मुख्यमंत्र्यांवर योग्य उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या हृदयाच्या स्थितीतही सुधारणा झाली आहे", असे डॉ. जसवाल यांनी सांगितले. (हेही वाचा, BMC 'Bhag Machchar Bhag' Campaign: 'भाग मच्छर भाग'; डेंग्यू आजाराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेची अनोखी मोहीम)

लेप्टोस्पायरोसिस म्हणजे काय?

लेप्टोस्पायरोसिस हा एक जिवाणूजन्य संसर्ग आहे. ज्यामुळे तीव्र ताप, स्नायू दुखणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये अवयव निकामी होऊ शकतात. हा एक उष्णकटिबंधीय रोग आहे, जो प्रामुख्याने दूषित पाण्याद्वारे संक्रमित होतो. लवकर निदान आणि प्रतिजैविक उपचार हे बरे होण्यासाठी महत्त्वाचे आहेत.