Arvind Kejriwal (File Image)

मुंबईत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या ‘इंडिया’च्या (I.N.D.I.A.) बैठकीपूर्वी पंतप्रधानपदाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आम आदमी पक्षाचे (AAP) नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवू इच्छितात अशी माहिती मिळाली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देशाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या प्रियांका कक्कर यांनी केली होती. यानंतर या प्रकरणाबाबतच्या चर्चेला उधाण आले.

आता याबाबत दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की. ‘अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याचे मुख्य प्रवक्त्याचे वैयक्तिक मत असू शकते. मात्र अरविंद केजरीवाल हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अजिबात सामील नाहीत.’ त्यांनी पुढे असेही सांगितले की, आज भारताला वाचवायचे आहे, देशाचे संविधान आणि तिची लोकशाही वाचवण्याची गरज आहे. म्हणून आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा भाग आहे.

दिल्लीच्या सेवा विभागाच्या मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत केजरीवाल यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या मागणीच्या वृत्ताचे खंडन केले. त्या म्हणाल्या की, मी अधिकृतपणे सांगतेल की अरविंद केजरीवाल हे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमध्ये नाहीत. पंतप्रधान बनण्यासाठी किंवा मंत्री बनण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीमध्ये सामील झालो नाही.’ (हेही वाचा: Rahul Gandhi On India-China Border: मी नेहमीच म्हणत आलो आहे की पंतप्रधान खोटे बोलत आहेत; राहुल गांधी यांचे चीनच्या नकाशावर वक्तव्य)

याआधी मंत्री गोपाल रायदेखील म्हणाले होते की, प्रत्येक पक्षाप्रमाणे आप सदस्यांनाही त्यांच्या पक्षाचे मुख्य आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहायचे आहे. प्रत्येक पक्षाला आपला नेता पंतप्रधान व्हावा असे वाटते. त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय संयोजक पंतप्रधान व्हावेत, अशी आम आदमी पार्टीचीही इच्छा आहे. पण इंडिया ब्लॉकचा पंतप्रधानपदाचा उमेदवार विरोधी आघाडी ठरवेल.