PM Narendra Modi on Indian Economy in Nashik: भारत जगातील टॉप-5 क्रमांकाची अर्थव्यवस्था- पंतप्रधान नरेंद्र मोदी
Narendra Modi | (Photo Credit: ANII)

देशातील युवा शक्तीने देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. या योगदानामुळेच भारत जगातील टॉप-5 क्रमांकाची अर्थव्यवस्था (India Is Top-5 Economies Country in the World) बनला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. पंतप्रधान आज (12 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नाशिक (Narendra Modi in Nashik) येथील युवा महोत्सवाचे उद्धाघटन करताना ते बोलत होते. आजची युवा पिढी ही विशेष भाग्यवान आहे. देश विकासाच्या मार्गावर असताना आपला हातभार विकासासाठी लागतो आहे. त्यामुळे असे काम करा की, पुढच्या अनेक पिढ्यांनी तुमचे नाव काढले पाहिजे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले.

'सरकारने युवकांसाठी अनेक गोष्टी केल्या'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांचा सेवाभाव देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. याच युवकांच्या ताकदीची झलक अवघ्या जगाला पाहायला मिळेल. आपल्या सरकारला 10 वर्षे होत आहेत. या दहा वर्षांमध्ये सरकारने युवकांसाठी अनेक गोष्टी केल्या. त्यामुळे युवकांना विविध संधी मिळाल्या. सरकारने प्रत्येक क्षेत्रात नवनव्या संधी निर्माण केल्या. ज्याचा परिणाम देशातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर आपले कौशल्य दाखवता आले. त्यामुळे शिक्षण आणि कौशल्य दाखविण्यासाठी भारत सोडून जगभरामध्ये इतर देशांमध्ये जाणाऱ्या तरुणांची संख्या कमी झाली. या तरुणांना देशामध्येच या संधी मिळाल्या असल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला. सध्याचा काळ हा स्वप्नांचा विस्तार करण्याचाही असल्याचे ते म्हणाले. (हेही वाचा, Mumbai Trans Harbour Link Inauguration Today: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन, जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याविषयी)

'भारताची इंटरनेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये विशेष क्रांती'

सध्याचे सरकार हे प्रचंड गतीमान आहे. पाठिमागच्या सरकारने अनेक वर्षांमध्ये जे केले नाही. ते आपण या सरकारच्या माध्यमातून करतो आहोत. प्रत्येक क्षेत्रात गतीने काम सुरु आहे. आज भारताने इंटरनेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये विशेष क्रांती केली आहे. आज आपण चंद्रावर पोहोचलो आहोत. इंटरनेटमध्ये क्रांती केली आहे. त्यामुळेच जगभरातील विविध देशांपेक्षाही आज आपण कमी दरामध्ये जनतेला इंटरनेट उपलब्ध करुन देऊ शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

व्हिडिओ

भाषणाची मराठीतून सुरुवात

दरम्यान, महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान नेहमी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करतात. आजच्या भाषणाचीही सुरुवात पंतप्रधानांनी मराठीमध्ये केली. ते म्हणाले, आज मी विशेष भाग्यवान आहे. ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. याच मातिने देशाला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अनंत कान्हेरे यांसारखे लोक दिले. याच मातीमध्ये जीजामाता यांनी वीर छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म दिला. अशा या पवित्र मातीमध्ये मला येण्याची संधी मिळाली याचा मला विशेष अभिमान असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.