PM Narendra Modi On  Adani Group Issue: अदानीच्या मुद्यावरुन राहुल गांधी यांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? घ्या जाणून
Narendra Modi | (Photo Credit - Twitter/ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत यूपीए सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा भाष्य केले. त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले. मात्र, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे मात्र कटाक्षाने टाळले. राहुल गांधी यांनी हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्ट, गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी (PM Narendra Modi On Adani Group Issue) यांचे संबंध, अदानी समूहाबद्दल उपस्थित करण्यात आलेले प्रश्न, अशा विविध मुद्द्यांवर पंतप्रधान भाष्य करतील असे अपेक्षीत होते. मात्र, पंतप्रधानांनी अदानींच्या मुद्यावर भाष्य करणे कटाक्षाणे टाळले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा भर प्रामुख्याने यूपीए सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर होता. पंतप्रधानांनी टूजी, कोलगेट, कॅश फॉर व्होट आणि कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यांचा उल्लेख करून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएवर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमधील संरक्षण घोटाळ्यांबद्दलही भाष्य केले आणि 2004 ते 2014 या दशकाला "हरवलेले दशक" असेही म्हटले. (हेही वाचा, हिंडनबर्ग रिपोर्ट आणि अदानी मुद्द्यांवरु राहुल गांधी आक्रमक; मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार)

दरम्यान, पंतप्रधान आपल्या भाषणात अदानी समूहाचा उल्लेखही करत नसल्याचे पाहून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अदानी समूहावरील आरोपांची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी करत विरोधी खासदारांनी त्यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, टीएमसीचे महुआ मोईत्रा आणि आरजेडीचे मनोज झा यांच्यासह विरोधी खासदारांनी यापूर्वी अदानी मुद्द्यावरून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला होता. अदानींच्या फायद्यासाठी मोदी सरकार नियम झुगारत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. पीएम मोदींचे उद्योगपतीशी काय संबंध आहेत, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. मात्र, पंतप्रधानांनी यापैकी कोणत्याच मुद्द्यावर भाष्य केले नाही.