
देशातील कोरोना बाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा गेल्या तीन आठवड्यापासून कमी होताना दिसत आहे. तर अनेक राज्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे, असे नीती आयोगाचे (NITI Aayog) सदस्य व्ही. के. पॉल (V. K. Paul) यांनी रविवारी (18 ऑक्टोबर) सांगितले. परंतु, हिवाळ्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट (COVID-19 Second Wave) येण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही. देशातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम करत असलेल्या तज्ञांचे व्हि. के. पॉल हे प्रमुख आहेत. पीटीआयला (PTI) दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता अमान्य केली नाही.
हिवाळ्यात कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट येऊ शकते का? या प्रश्नावर पॉल म्हणाले, "हिवाळा सुरु होताच युरोप सारख्या देशांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भारतातही कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोविड-19 बद्दल नव्या गोष्टी समोर येत आहेत आणि त्यावर संशोधन सुरु आहे." (Second Wave of COVID-19 in France: कोरोना व्हायरस संक्रमनाची दुसरी लाट; फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमैनुएल मैक्रों यांच्याकडून अनेक शहरांमध्ये जमावबंदी)
गेल्या तीन आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून काही राज्यांमध्ये संसर्गाची स्थिती स्थिर असल्याचे चित्र दिसून येत असले तरी काही राज्यांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. यात प्रामुख्याने केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगढ आणि पश्चिम बंगाल या 5 राज्यांचा समावेश आहे. तर 3-4 केंद्रशासित प्रदेशातही कोरोना बाधितांचे वाढते आकडे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, "माझ्यामते देशातील कोरोना संसर्गाची स्थिती आता बरी आहे. परंतु, आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. कारण अजून 90% लोकांना कोविड-19 चा संसर्ग होण्याची शक्यता आहे."
दरम्यान, कोविड-19 वरील लस उपलब्ध झाल्यावर तिचे वितरण करण्याकरीता पुरेसे मार्ग आहेत. तसंच लस नागरिकांना अगदी सहज मिळू शकेल, याकडेही प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. लसी ठेवण्यासाठी भारताकडे पुरेशी कोल्ड स्टोरेज क्षमता आहे आणि आवश्यकतेनुसार ती वाढता येईल. त्यामुळे लस वितरणाची शंका बाळण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (COVID-19 Vaccine Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोविड-19 लसीच्या वितरणाचा आढावा; जलद पुरवठ्यासाठी पूर्वतयारीकडे विशेष लक्ष)
आरोग्य मंत्रालयाच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, देशातील कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृतांचा आकडा 1,14,031 वर पोहचला आहे. तर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी 8 लाखांच्या खाली आहे.